yuva MAharashtra जादा नफ्याच्या अमिषाने सांगलीतील व्यापाऱ्याला आर्थिक गंडा; २०.८८ लाखांची फसवणूक उघड

जादा नफ्याच्या अमिषाने सांगलीतील व्यापाऱ्याला आर्थिक गंडा; २०.८८ लाखांची फसवणूक उघड

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. २४ जुलै २०२५

जास्त परताव्याच्या आमिषाने विश्वास संपादन करत सांगलीतील एका किराणा व्यापाऱ्याची तब्बल २० लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जयकुमार वर्मा, आकांक्षा चुबे आणि आमांन्सा अन्वी (पूर्ण पत्ता उपलब्ध नाही) यांच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात दीपचंद रिकबचंद लुक्कड (रा. टीव्हीएस शोरूमजवळ, माधवनगर रोड, सांगली) यांनी तक्रार दाखल केली आहे. १९ मे ते ३० मे २०२५ दरम्यान हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादी लुक्कड यांचा किराणा मालाचा व्यवसाय असून, फसवणूक करणाऱ्यांनी ‘जास्त नफा मिळवून देतो’ असा विश्वास निर्माण करून सुरुवातीला ओळख वाढवली. नंतर विविध बँक खात्यांत २२.५० लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडले. काही विश्वास मिळवण्यासाठी त्यांनी सुरुवातीला १.६२ लाख रुपयांचा परतावा दिला, मात्र उर्वरित रकमेसाठी सतत टाळाटाळ करत राहिले.

वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लुक्कड यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तिन्ही संशयितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.