| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. २४ जुलै २०२५
वारंवार शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या व अधिवेशन सुरू असताना सभागृहात ऑनलाईन रमी गेम खेळणाऱ्या कृषीमंत्री श्री. माणिकराव कोकाटे यांचा जाहीर निषेध करत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष संगली शहरजिल्हा व ग्रामीण च्या वतीने आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री श्री. माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वीच आपल्या विविध विधानांनी संपूर्ण राज्यात बदनाम झाले आहेत. शेतकऱ्याचा अर्वाच्च भाषेत उद्धार करणे असो किंवा पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देतानाची अरेरावी असो. त्यांचे कर्जमाफी वरील वक्तव्य तर संपूर्ण महाराष्ट्राने ऐकले आहे.
कृषी मंत्री महोदयांनी शेतकरी वर्गाविषयी अपशब्द वापरणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहेच त्यामध्येच भर क़ि काय, रविवार, दि. २०/७/२०२५ रोजी राज्याचे कृषि मंत्री हे अधिवेशन सुरू असताना सभागृहात चक्क ऑनलाईन पत्त्यांचा रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ प्रसार माध्यमांमध्ये प्रसिध्द झाला आहे. श्री. माणिकराव कोकाटे यांच्या विविध वक्तव्य व कृतीमुळे राज्यातील जनतेकडून त्यांच्या विषयी तीव्र रोष वारंवार व्यक्त होत असून तो वाढतच चालला आहे.कृषी मंत्री श्री. माणिकराव कोकाटे हे जनतेने त्यांना दिलेल्या जबाबदारी प्रति गांभीयनि न वागता त्याविरुध्द वर्तन करीत असून, त्यांची मंत्रीपदापासून सुरु झालेली कारकीर्द ही अधिकाधिक वादग्रस्त होत चाललेली आहे. त्यामुळे त्यांची राज्यात प्रतिमा मलीन होतच आहे परंतु गेल्या काही दिवसातील घटना लक्षात घेता सुसंस्कृत महाराष्ट्र राज्याची देखील संपूर्ण देशात बदनामी झालेली आहे.
तरी कृषी मंत्री श्री. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा. अशी मागणी आंदोलन स्थळी करण्यात आली. यावेळी आ.अरुण लाड, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव, महिला शहरजिल्हाध्यक्षा संगिता हारगे, सचिन जगदाळे, ताजुद्दीन तांबोळी, आनंदराव नलवडे, आयुब बारगिर, विश्वासराव पाटील, विराज कोकणे, महालिंग हेगडे, बी.के नाईकवडी, संदीप व्हनमाणे, विजय माळी, आकाराम कोळेकर, आकाश कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.