| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. २४ जुलै २०२५
सांगली आणि मिरज शहरांतील धार्मिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, विनापरवाना ध्वनिक्षेपक वापरणाऱ्या धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू करण्यात आली असून आतापर्यंत ९६ ध्वनिक्षेपक हटविण्यात आले आहेत. लवकरच आणखी १३८ ध्वनिक्षेपक काढून टाकले जाणार आहेत.
या मोहिमेत मिरजमधील ८० मंदिरे, ७० अन्य प्रार्थनास्थळे व २ चर्च तसेच सांगलीतील ४४ मंदिरे, ३४ प्रार्थनास्थळे व ४ चर्च अशा एकूण २३४ धार्मिक स्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यापैकी मिरजमधील ८५ आणि सांगलीतील ११ ठिकाणी कारवाई पार पडली आहे.
राज्य पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिलेल्या आदेशानुसार, परवानगीशिवाय लावलेले ध्वनिक्षेपक तत्काळ हटवण्याचे निर्देश दिले गेले आहेत. संबंधित संस्थांना नोटिसा पाठवून जागरूक केलं जात आहे. जर धार्मिक विश्वस्तांनी स्वतःहून ध्वनिक्षेपक काढले नाहीत, तर त्यांच्यावर दररोज ५ हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे.
शहरांतील ध्वनिप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने ही कारवाई केवळ कायदेशीर नव्हे, तर सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण ठरत आहे.