फोटो सौजन्य : फेसबुक वॉलवरुन
| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - सोमवार दि. १४ जुलै २०२५
हिंदी सक्तीविरोधात अलीकडेच पार पडलेल्या यशस्वी सभेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आत्मविश्वास वाढलेला दिसतो. या पार्श्वभूमीवर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसेने आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
युतीच्या चर्चांमुळे चर्चेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत संभाव्य घरोब्याच्या पार्श्वभूमीवर, राज ठाकरे यांनी आता थेट मैदानात उतरायचे ठरवले आहे. पक्षाच्या रणनीतीसाठी एक विशेष शिबिर आयोजित करण्यात आले असून, त्यासाठी राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना थेट आदेश देण्यात आले आहेत — "कपड्यांची बॅग घ्या आणि शिवतीर्थावर हजर व्हा." असे या आदेशात म्हटले आहे.हे शिबिर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कॅमल रिसॉर्ट येथे दोन दिवस (१४ व १५ जुलै) आयोजित करण्यात आले आहे. पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकचीच पुन्हा निवड केल्याने अनेक राजकीय समीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज ठाकरे स्वतः या शिबिराला उपस्थित राहून आगामी स्थानिक निवडणुकांची दिशा, प्रचार यंत्रणा, रणनीती आणि शक्य असलेल्या युतीच्या पर्यायांवर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
तथापि, या शिबिराची माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी राज ठाकरे यांनी विशेष दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. माध्यमांपासून दूर राहण्याची सक्त ताकीद देताना, कोणतीही माहिती, प्रतिक्रिया वा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नये, असा कडक इशारा देण्यात आला आहे.
पक्ष प्रवक्त्यांनाही राज ठाकरे यांच्या परवानगीशिवाय कोणताही जाहीर विधाने न देण्याचा आदेश देण्यात आला आहे. यामुळे या संपूर्ण शिबिराभोवती एक प्रकारचे गूढ वातावरण निर्माण झाले असून, मनसे काहीतरी 'स्पेशल मिशन' आखते आहे का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.
याआधीही नाशिकमध्ये मनसेचे राज्यस्तरीय शिबिर पार पडले होते. मात्र, सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये हा उपक्रम केवळ मार्गदर्शन शिबिर न राहता, पुढील युती आणि प्रचाराचे खरे ‘ब्लूप्रिंट’ ठरू शकतो, अशी चर्चा आता रंगत आहे.