| सांगली समाचार वृत्त |
सांगली - सोमवार दि. १४ जुलै २०२५
१४ जुलै १९३७ या दिवशी ब. आण्णासाहेब लठ्ठे यांची मुंबई इलाख्याचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली, ही केवळ राजकीय घटना नव्हे, तर संपूर्ण जैन समाजासाठी गौरवशाली क्षण होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला खुद्द ब्रिटिश सरकारनेही दाद दिली, हेच सांगून जातं की त्यांनी साकारलेली अर्थनीती केवळ आकड्यांची मांडणी नव्हती, ती सामान्य माणसाच्या उत्थानासाठी आखलेली समतोल योजना होती.
समतेच्या अर्थशास्त्राचा पुरस्कर्ता
लठ्ठे साहेबांचा आर्थिक दृष्टिकोन स्पष्ट होता – समाजातील संपन्न घटकांकडून अधिक कर घ्या आणि दुर्बळ घटकांच्या उन्नतीसाठी तो निधी वापरा. हा दृष्टिकोन त्यांचे स्नेही व तत्कालीन विचारवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थनीतीशी साम्य दर्शवणारा होता. त्यांची वित्तीय धोरणे केवळ व्यवस्थापनापुरती मर्यादित नव्हती, ती सामाजिक न्यायाची व्याख्या होती.
१९३७-३८ व १९३८-३९: अर्थसंकल्पातील लोककल्याण
त्यांनी अर्थमंत्री म्हणून सादर केलेल्या दोन अर्थसंकल्पांतून अनेक क्रांतिकारी निर्णयांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. काही महत्त्वाचे ठळक मुद्दे:
🔹 दारुबंदीचा धाडसी निर्णय
१ ऑगस्टपासून संपूर्ण मुंबई शहरात दारुबंदी लागू करण्याची घोषणा.
गिरणी कामगारांच्या वेतनदिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय.
दारुबंदीमुळे होणारी आर्थिक तूट स्थावर मालमत्तांवर कर लावून भरून काढण्याची युक्ती.
🔹 शेतकरीहिताच्या योजना
कर्जमाफी योजनेंतर्गत सहकारी संस्थांचे व तगाई कर्जांचे पुनर्रचना.
शेतसारा कपात आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३० लाखांचा बोजा शासनाने स्वीकारला.
🔹 ग्रामविकासाचे दृष्टीकोन
नापीक जमिनी सुधारून त्यावर आधुनिक पद्धतीने शेती सुरू करणे.
सहकाराच्या माध्यमातून पशुपालनाला चालना.
ग्रामीण आर्थिक विकासासाठी ७५ लाखांची तरतूद.
🔹 शहरांवरील कर संरचना
शहरातील वाहन, वीज व इंधनावरील करात वाढ.
या माध्यमातून ग्रामीण कल्याण योजनांना आर्थिक पाठबळ.
🔹 शिक्षण विस्तार
प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यासाठी स्थानिक संस्थांना निधी.
७०० लोकसंख्येच्या गावी शाळा सुरू करण्याची तरतूद.
मुलींसाठी सातवीपर्यंत शिक्षणाची सोय.
वर्धा शिक्षण योजनेसाठी स्वतंत्र निधी.
समाजहितसंधान असलेला अर्थमंत्री
दारूबंदी जाहीर करताना त्यांनी फक्त महसूलाचा विचार केला नाही, तर गरीबांच्या उध्वस्त होत असलेल्या संसारांचा विचार केला. म्हणूनच ते केवळ अर्थमंत्री नव्हते, तर 'अर्थनीतीचे लोकशाही शिल्पकार' होते.
त्यांनी दाखवलेला शेतकरीहिताचा मार्ग, ग्रामविकासाची ध्येयधोरणे आणि आर्थिक समतेच्या उंबरठ्यावर उभे केलेले अर्थसंकल्प आजही आदर्श ठरतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भ. महावीरांच्या आदर्शांचा प्रत्यय यावा, इतकी नितीमत्ता आणि सेवाभाव त्यांच्या कार्यातून झळकत होता.
१४ जुलै: ‘आण्णासाहेब लठ्ठे राजयोग दिन’
सार्वजनिक जीवनात आमदार, खासदार आणि मंत्री या तिन्ही भूमिका समर्थपणे निभावत त्यांनी ज्या पद्धतीने सेवा केली, ती दक्षिण भारत जैन सभेच्या गौरवशाली परंपरेचे प्रतिबिंब होती. त्यामुळे १४ जुलै हा दिवस ‘जैन लठ्ठे राजयोग दिन’ म्हणून साजरा व्हावा, ही भावना जैन समाजाच्या आत्मगौरवाची अभिव्यक्ती ठरेल.
—
प्रा. एन. डी. बिरनाळे
महामंत्री (सांगली)
दक्षिण भारत जैन सभा