yuva MAharashtra अवयवदान : जीवनदानाची संधी देणारा संकल्प

अवयवदान : जीवनदानाची संधी देणारा संकल्प

             फोटो सौजन्य  : दै. ललकार 


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. ३ जुलै २०२५

मानवी जीवनाला दुसरी संधी देणारा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ‘अवयवदान’. जुलै महिना हा भारतात 'अवयवदान जनजागृती महिना' म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर अवयवदानाच्या प्रक्रियेबाबत व्यापक आणि स्पष्ट माहिती असणे आवश्यक आहे.

आपले शरीर हे असंख्य पेशी, ऊती आणि अवयवांनी बनलेले असते. हृदय, यकृत, फुप्फुसे, मूत्रपिंड, स्वादुपिंड, नेत्र, त्वचा यांसारख्या अवयवांद्वारे शरीरातील महत्वाच्या क्रिया सुरळीत चालतात. परंतु, अपघात, आजार किंवा जन्मजात दोषांमुळे काही अवयव निकामी होतात आणि रुग्णास जीव वाचवण्यासाठी ‘अवयव प्रत्यारोपणा’ची आवश्यकता निर्माण होते.

अवयवदानाचे प्रकार:

अवयवदान दोन पद्धतींनी करता येते —

1. जिवंतपणीचे दान (Live Donation):
कुटुंबातील सदस्य – आई-वडील, भाऊ-बहिण, पती-पत्नी – हे किडनी किंवा यकृताचा भाग दान करू शकतात. हे दान फक्त नातेवाईकांसाठीच करता येते आणि त्यासाठी वैद्यकीय तपासणी व शासनाची मंजुरी आवश्यक असते.

2. मृत्यू नंतरचे दान (Cadaver Donation):
जर मेंदू कार्य करेनासा झाला असेल (ब्रेन स्टेम डेड), तर त्या रुग्णाचे अवयव – जसे की हृदय, फुप्फुसे, यकृत, मूत्रपिंड इत्यादी – इतर गरजू रुग्णांसाठी वापरले जाऊ शकतात. मृत्यूनंतरदेखील जीवन देण्याची संधी अशी निर्माण होते.

नेत्रदान आणि त्वचादान:

नेत्रदानासाठी मृत्यूच्या ४-६ तासांच्या आत संबंधित संस्थेशी संपर्क करणे आवश्यक असते. डोळ्याच्या ‘कॉर्निया’ भागाचेच प्रत्यारोपण केले जाते. विशेष बाब म्हणजे – मोतीबिंदू, चष्मा किंवा मधुमेह असलेली व्यक्तीदेखील नेत्रदान करू शकते.

त्वचादान देखील मृत्यूनंतर करता येते. कमरेखालील भागाची पातळ त्वचा एका विशेष उपकरणाद्वारे घेण्यात येते. यामध्ये शरीर विद्रूप होत नाही, रक्तस्राव होत नाही आणि केवळ जळालेल्या रुग्णांवर अत्यंत प्रभावी उपचार शक्य होतो.

देहदान – वैद्यकीय शिक्षणासाठी एक अमूल्य योगदान:

शरीरशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण देहदान फार उपयुक्त ठरते. यासाठी मृत्यूपूर्वी नोंदणी करणे आणि कुटुंबीयांची संमती घेणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या व्यक्तीचा मृत्यू कुठेही झाला, तरी त्याचा उपयोग जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयात केला जाऊ शकतो.

अवयवदानासाठी नोंदणी कशी करावी?

अवयवदानासाठी इच्छुकांनी www.notto.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 'प्लेज फॉर्म' भरावा. आधार लिंक असलेल्या मोबाईलद्वारेही ही प्रक्रिया सहज करता येते. याशिवाय, ‘नोटो’चा QR कोड स्कॅन करून देखील नोंदणी शक्य आहे. अर्ज भरल्यानंतर तात्काळ प्रमाणपत्र दिले जाते.

गैरसमज दूर करूया, जागरूकतेकडे वाटचाल करूया:

अवयवदानाच्या बाबतीत अनेक अंधश्रद्धा, धार्मिक संकोच, अज्ञान आणि भीती आडवी येतात. परंतु आज समाजात बदल होत आहे. सांगली जिल्हाधिकारी श्री. अशोक काकडे यांनी ‘सांगली पॅटर्न’च्या माध्यमातून अवयवदानाची चळवळ उभारली आहे. त्यांना डॉ. हेमा शितल चौधरी (सांगली जिल्हा समन्वयक, दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन) यांचे सक्रिय मार्गदर्शन लाभत आहे.

संदेश:

जिवंत राहून कोणाला मदत करणं सर्वांना जमतं, पण मृत्यूनंतर देखील जीवनदायी ठरणं हे फार थोड्यांना शक्य होतं – आणि ते फक्त अवयवदानातूनच. म्हणूनच, एक सजग नागरिक म्हणून आपण सखोल माहिती मिळवून अवयवदानाचा पुरस्कार करूया, प्रचार करूया आणि या पवित्र कार्याचा भाग बनूया.

✍️ डॉ. हेमा शितल चौधरी
जिल्हा समन्वयक, सांगली
दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन