yuva MAharashtra शक्तीपीठ महामार्गाला विरोध चिघळला; खा. विशाल पाटील, राजू शेट्टी यांच्यासह शेकडोंवर गुन्हे दाखल

शक्तीपीठ महामार्गाला विरोध चिघळला; खा. विशाल पाटील, राजू शेट्टी यांच्यासह शेकडोंवर गुन्हे दाखल

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. ३ जुलै २०२५

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला गती देण्यात आली असून, आता या मार्गाच्या मोजणीसाठी पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू आहे. मात्र, याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

कोल्हापूरमध्ये आंदोलनाला मोठा उधाण आलं असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोठा रास्ता रोको करण्यात आला. सांगली येथे देखील याच पार्श्वभूमीवर अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी अंकली येथे आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला.

विशाल पाटील यांच्या सहभागामुळे आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा फटका बसला आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी पाटील यांच्यासह सुमारे ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

या आंदोलनामुळे सांगली ते कोल्हापूर मार्ग आणि रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग काही वेळ ठप्प झाला होता. या दरम्यान, आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करत मार्गावरील वाहतूक रोखली.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २० जूनपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. मात्र, या आदेशाची पायमल्ली करत स्वाभिमानी कार्यकर्ते आणि नेत्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरत निषेध नोंदवला.

दरम्यान, कोल्हापुरातही आंदोलनाला जोर आला असून, पंचगंगा नदीवरील पुलावर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. काही शेतकऱ्यांनी आंदोलना दरम्यान सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया देत नदीत उड्या मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी शेट्टींसह सुमारे ४०० आंदोलकांविरोधात गुन्हे नोंदवले असून, त्यात माजी आमदार ऋतुराज पाटील, राजू बाबा आवळे आणि शिवसेनेचे विजय देवणे यांचाही समावेश आहे.

शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला सुरु असलेला प्रशासनाचा फास्ट ट्रॅक विरोधात आता शेतकरी संघटनांचा एल्गार सुरू असून, शासन-शेतकरी संघर्षाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.