| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - गुरुवार दि. ३ जुलै २०२५
सांगली शहरातील स्टेशन चौकात उभारण्यात येत असलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाचे रखडलेले काम लवकरच पूर्णत्वास नेले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. उर्वरित कामासाठी आवश्यक असलेल्या निधीच्या प्रस्तावासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जयश्री पाटील यांनी मंगळवारी मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री विनय कोरे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा नेते समित कदम, तसेच सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील हेही उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून स्मारकाचे काम निधीअभावी थांबले आहे. एकूण आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला तर हे काम मार्गी लागेल, असे जयश्री पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, निधी मिळवण्यासाठी आवश्यक तातडीचा प्रस्ताव मागवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.स्मारकाच्या प्रगतीला गती देण्यासाठी जयश्री पाटील यांचा समावेश अधिकृत स्मारक समितीत करण्याची सूचना देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिली आहे.