yuva MAharashtra "मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय... मी तुम्हाला मदत करतो...." अन् मग घडलं असं...

"मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय... मी तुम्हाला मदत करतो...." अन् मग घडलं असं...

| सांगली समाचार वृत्त |
छ. संभाजीनगर - सोमवार दि. १४ जुलै २०२५

सायबर गुन्हेगारीचा चेहरा दिवसेंदिवस अधिकच धोकादायक होत चालला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगार आता सरळ लोकांच्या भावनांशी खेळू लागले आहेत. अशाच एका धक्कादायक प्रकारात, छत्रपती संभाजीनगरातील एका निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कुटुंबाला तब्बल ७८ लाख ६० हजार रुपयांना गंडवण्यात आलं आहे.

या संपूर्ण फसवणुकीत गुन्हेगाराने स्वत:ला पोलीस अधिकारी म्हणून भासवत, अगदी खासदार-स्तरीय अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करत दहशत निर्माण केली. 'तुमचं नाव मनी लॉन्ड्रिंगप्रकरणात आहे', 'दहशतवादीने तुमचं आधार वापरलं', 'तुमच्यावर अटक होणार' अशा बनावट गोष्टी सांगून संशयितांनी आपल्या जाळ्यात त्यांना ओढलं.

२ जुलै रोजी पीडित वृद्धाला व्हिडिओ कॉल आला. "मी संजय पिसे बोलतोय" असं सांगून त्याच्या पत्नीच्या आधारकार्डावर सिम घेतलं गेलं असून त्यातून २ कोटींचं आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला.

पुढे ४ जुलैला, व्हिडिओ कॉलवर दुसरी व्यक्ती "मी विश्वास नांगरे पाटील" असल्याचं सांगून, पीडिताचा विश्वास जिंकतो. चौकशीला सहकार्य केल्यास मदत करू असं सांगितलं जातं. या दबावाखाली पीडिताने आपली ६९ लाखांची एफडी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे पाठवली. दुसऱ्या दिवशी आणखी ९.६ लाख रुपये पाठविण्यात आले.

जवळपास ७८ लाख रुपये गेल्यावर, वृद्धाने हा प्रसंग आपल्या जावयाला सांगितला. त्याने तत्काळ सावध होऊन यामागे फसवणूक असल्याचा अंदाज घेतला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. आता या घटनेवर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संजय पिसे आणि त्याचे सहकारी यांच्यावर तपास सुरु आहे.

राज्यभरात अनेक ठिकाणी अशा गुन्ह्यांची नोंद होत असून, पोलीस प्रशासन आणि सरकारकडून सातत्याने जनजागृती केली जात आहे. मात्र सायबर भामटे दिवसेंदिवस अधिकच हुशार होत चाललेत, हेच या घटनेतून दिसून येतं.

या प्रकारातून एक गोष्ट पुन्हा अधोरेखित होते – कधीही कुणालाही बँक तपशील, ओटीपी, आधार क्रमांक, किंवा आर्थिक व्यवहारांबाबतची माहिती देऊ नये. अधिकारी असल्याचा दावा करत कोणी संपर्क केला, तर तो स्थानिक पोलिसांशी त्वरित संपर्क साधून पडताळावा.

विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बाब अधिक संवेदनशील आहे. त्यामुळे घरातील तरुणांनी आपल्या वृद्ध नातलगांना सतत जागरूक ठेवणं आवश्यक आहे.