| सांगली समाचार वृत्त |
ईश्वरपूर - मंगळवार दि. २२ जुलै २०२५
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. "ईश्वरपूर" हेच शहराचे प्राचीन नाव असल्याचा दावा काही राजकीय नेत्यांकडून केला जात असून, त्यामुळेच हे नाव पुन्हा बहाल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या निर्णयामुळे "उरूण" या ऐतिहासिक भागाचे काय होणार, असा प्रश्न उरूण परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, जनतेच्या दीर्घकाळच्या मागणीनुसार माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी 'ईश्वरपूर' नामकरणाचा ठराव मांडला होता, ज्याला राज्य शासनाने तात्काळ मान्यता देत केंद्र सरकारकडे सादर केले आहे.
शहराचा इतिहास पाहता, 'उरूण-इस्लामपूर' या नावानेच हे शहर स्थानिकांमध्ये ओळखले जाते. १६ नोव्हेंबर १८५३ रोजी नगरपरिषदेची स्थापना झालेल्या या शहरात मुस्लिम समुदायाचे वास्तव्य अधिक प्रमाणात होते, ज्याचे पुरावे शहराभोवती असलेल्या पीर स्थानकांवरून मिळतात. तरीसुद्धा, काहींच्या मते "ईश्वरपूर" हेच मूळ नाव होते.
सध्याच्या घडीला शहरात प्रांत, तहसील, पोलिस ठाणे, न्यायालय, भूमी अभिलेख, दस्त नोंदणी कार्यालयांसह सर्व प्रमुख शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. शैक्षणिकदृष्ट्याही शहराला महत्त्वाचे स्थान आहे.
नामांतरणाला काही संघटनांनी पूर्वी विरोध केला असला तरी आता 'ईश्वरपूर' या नावाच्या घोषणेनंतर भाजप, शिवसेना व इतर गटांत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. तथापि, 'ईश्वरपूर' हे नाव निश्चित होणार की 'उरूण ईश्वरपूर' हा पर्याय विचाराधीन आहे, यावर सुस्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
"उरूण"ला न्याय द्या - स्थानिकांची मागणी
"आम्ही उरूण भागातील रहिवासी आहोत. आमच्या आठवणी, ओळख आणि इतिहास 'उरूण इस्लामपूर' या नावाशी जोडलेला आहे. त्यामुळे नवीन नावही 'उरूण ईश्वरपूर' असावे," अशी मागणी दिग्विजय पाटील, सुमित पाटील, जयेश जाधव, अमोल पाटील, राजवर्धन पाटील, गणेश पाटील, सौरभ पाटील या स्थानिकांनी व्यक्त केली आहे.