yuva MAharashtra आधार कार्ड त्रुटींमुळे हजारो शिक्षकांच्या नोकर्‍यांना धोका; विद्यार्थ्यांच्या नोंदणीत गंभीर अडथळे

आधार कार्ड त्रुटींमुळे हजारो शिक्षकांच्या नोकर्‍यांना धोका; विद्यार्थ्यांच्या नोंदणीत गंभीर अडथळे

              फोटो सौजन्य : चॅट जीपीटी

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - मंगळवार दि. २२ जुलै २०२५

राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये आढळलेल्या त्रुटी आता शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. आधार क्रमांकात नोंद झालेल्या चुकांमुळे तब्बल तीन लाख विद्यार्थ्यांची ओळख प्रणालीवर स्पष्टपणे नोंद होऊ शकलेली नाही. परिणामी, सुमारे तीन हजार शिक्षकांचे पदच भविष्याच्या दृष्टीने अनिश्चिततेत सापडले आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या संचमान्यतेच्या निकषांनुसार, प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार क्रमांक अद्ययावत असणे आवश्यक आहे. त्यावरच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची संख्याही ठरवली जाते. मात्र, वास्तविकतेत पाहता अनेक विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख किंवा बायोमेट्रिक माहिती अचूक नोंदलेली नसल्याने ही प्रक्रिया अडथळ्यात आली आहे.

काही प्रकरणांत, मुलांचे ठसे जुळत नाहीत, तर काही ठिकाणी फोटो चुकीचा आहे किंवा जन्मतारीख आणि नावाच्या स्पेलिंगमध्ये तफावत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आधार असूनही तो अमान्य ठरत आहे. विशेष म्हणजे, शाळांमध्ये जन्मदाखला दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुलभ नाही, परिणामी आधार सुधारण्यात विलंब होत आहे.

संचमान्यतेसाठी आधारच अडथळा

संचमान्यता प्रक्रियेत या विद्यार्थ्यांचा गैरहजेरीमुळे शाळेची अधिकृत पटसंख्या कमी भासते. याचा थेट परिणाम शाळेच्या अनुदानावर आणि कर्मचार्‍यांच्या संख्येवर होतो. त्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्यात सध्या हजारो विद्यार्थ्यांच्या बायोमेट्रिक माहितीमध्ये सुधारणा सुरु असली तरी ती प्रक्रिया संथ गतीने चालू आहे.

शिक्षकांच्या भविष्यावर संकट

"आधार नोंदणीत सातत्याने अडचणी येत असून, यामुळे अनेक शिक्षकांची सेवा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे," असे प्रतिपादन पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी केले. ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांची संख्या आणि इयत्ता स्पष्ट न झाल्यास दहावी, बारावी तसेच शिष्यवृत्ती परीक्षा प्रक्रियेत अडथळे निर्माण होतील. शासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी.”