| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. २२ जुलै २०२५
राज्याचे महसूल मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या नाराजीच्या चर्चांवर मिश्किल प्रतिक्रिया दिली. "जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनातील विचारांचा अंदाज बांधता येत नाही. ते जर कोणत्या पत्रकारांशी याबाबत बोलले असतील, तर त्याच पत्रकाराला विचारून घ्यावं लागेल," असे सांगत त्यांनी मुद्दा हसण्यावारी नेला.
सोमवारी सांगली दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील यांनी वसंतदादा पाटील यांच्या स्मारक परिसराची पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, जनसुराज्य शक्तीचे समित कदम आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.
माध्यम प्रतिनिधींनी आमदार जयंत पाटील यांच्या संभाव्य नाराजीबाबत प्रश्न विचारल्यावर, चंद्रकांत पाटील यांनी ती गोष्ट हसण्याच्या वळणावर नेली आणि पत्रकारांनाच उत्तर शोधण्यास सांगितले.
याच वेळी, आगामी महापालिका निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी अंदाज वर्तवला की, निवडणुका डिसेंबरमध्ये होऊ शकतात. “मी निवडणूक आयोग नाही, त्यामुळे माझं म्हणणं शक्यता आहे,” असं नमूद करत त्यांनी सप्टेंबरपर्यंत विकासकामांची अंमलबजावणी शक्य असल्याचे स्पष्ट केले. कारण एकदा निवडणुकीची घोषणा झाली, की संपूर्ण आचारसंहिता लागू होईल.
विधानभवनात नुकत्याच घडलेल्या गोंधळाबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, अधिवेशनाच्या वेळी सभागृहात प्रवेशासाठी निश्चित नियमावली तयार करण्याची गरज आहे. सद्य नियमांनुसार आमदार व त्यांच्या अधिकृत सहाय्यकांनाच प्रवेश आहे, परंतु अपवादात्मक प्रसंगी मार्ग काढावा लागतो. संसदीय कामकाजमंत्री म्हणून मी पूर्वीच्या नियमांचे पुनरावलोकन करणार आहे, असेही त्यांनी सूचित केले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी केल्याबाबत विचारले असता, चंद्रकांत पाटील म्हणाले, "पराभवाची चाहूल लागली की मतदार यंत्रांवरच शंका घेतली जाते. आमचा आत्मविश्वास कोणत्याही निवडणूक पद्धतीसाठी ठाम आहे – आणि आम्ही विजय मिळवणारच!"