yuva MAharashtra “दलाली घेणाऱ्यांनी, दुसरा जिल्हा शोधावा !” खा. विशाल पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

“दलाली घेणाऱ्यांनी, दुसरा जिल्हा शोधावा !” खा. विशाल पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

           फोटो सौजन्य  : फेसबुक वॉलवरुन 

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - सोमवार दि. २१ जुलै २०२५

सांगलीत नुकत्याच पार पडलेल्या दिशा समितीच्या बैठकीत अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत खळबळ उडवून दिली. जिल्हा विकासाच्या कामांमध्ये निधीच्या वाटपात पारदर्शकता नसेल, तर सांगली जिल्ह्याचा विचार सोडावा, असा सणसणीत इशाराच त्यांनी दिला.

या बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद सीईओ तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, तसेच विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण विकास प्रकल्प, लोकसुविधा आणि निधीविषयक बाबींवर चर्चा व्हायची होती; मात्र बैठकीचा सूर वेगळ्याच कारणासाठी तीव्र झाला.

“निधी मिळवतो आम्ही, अडथळे निर्माण करता तुम्ही”

खासदार पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे बोट दाखवत स्पष्ट सांगितले की, संसदेत पाठपुरावा करून विकासनिधी खेचून आणण्याचे काम लोकप्रतिनिधी करतात. परंतु, त्या निधीचा वापर करताना काही मंडळी ‘वर्क ऑर्डर’साठी टक्केवारीची मागणी करतात, हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.

त्यांनी रोषाने नमूद केले की, निधी तांत्रिक कारणांनी अडवून ठेवण्यात येतो आणि त्याचा परिणाम विकासकामांच्या विलंबावर होतो. परिणामी, नागरिकांसमोर आमची कामगिरी अपूर्ण भासते.

'हवामान यंत्रणा' बसवली पण चालूच नाही!

केंद्र सरकारच्या निधीतून बसवण्यात आलेल्या हवामान विश्लेषण यंत्रणेबाबतही नाराजी व्यक्त झाली. एक वर्ष उलटून गेल्यानंतरही या यंत्रणा सुरु न झाल्याने उपस्थित लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे उत्तर मागितले. महापालिकेच्या उपायुक्तांनी विद्युतजोडणी न मिळाल्याचे कारण दिले, पण त्यावर समाधान व्यक्त झाले नाही.

शेतकऱ्यांना गोदामांपासून दूर ठेवणं अन्यायकारक – पाटील

शासकीय गोदामे खासगी संस्थांना भाड्याने देण्याच्या निर्णयावर तीव्र टीका करत खासदारांनी शेतकऱ्यांच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित केला. “जेव्हा शेतकऱ्यांना आपला माल साठवण्यासाठी सुरक्षित व किफायतशीर जागा मिळत नाही, तेव्हा त्यांच्या हितासाठी शासनाने उभारलेली गोदामे खासगी वापरासाठी देणे योग्य नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

स्वच्छतेवरून दोन्ही दादांचा आक्रमक पवित्रा

शहरातील कचरा व्यवस्थापनावरून आमदार गाडगीळ आणि खासदार पाटील, दोघेही आक्रमक झाले. महापालिका क्षेत्रातून दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा उचलला जात असल्याचे सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात शहरातील गल्लीबोळांमध्ये अजूनही कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात, असा आरोप गाडगीळांनी केला.

खासदार पाटलांनीही त्याच मुद्द्यावर भर देत, “जर रोज इतका कचरा गोळा होतो, तर शहर अजूनही अस्वच्छ का आहे?” असा थेट सवाल उपस्थित केला आणि यंत्रणेकडून ठोस कारवाईची मागणी केली.

दिशा समितीची बैठक विकासकामांवर चर्चा करण्यासाठी होती, पण अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजीचा सूर आघाडीवर राहिला. खासदार पाटलांचा रोखठोक आणि खणखणीत पवित्रा प्रशासनासाठी एक स्पष्ट संदेश घेऊन आला – "सांगलीकरांच्या विकासात अडथळा आणणाऱ्या कोणालाही येथे स्थान नाही!"