yuva MAharashtra गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा सन्मान; महाराष्ट्र सरकारची ऐतिहासिक घोषणा

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा सन्मान; महाराष्ट्र सरकारची ऐतिहासिक घोषणा

    फोटो सौजन्य  : Wikimedia commons 

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शुक्रवार दि. ११ जुलै २०२५

महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आणि जनतेच्या भावनांचा कळस ठरलेला गणेशोत्सव आता अधिकृतपणे राज्य महोत्सव म्हणून साजरा होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी विधीमंडळात ही ऐतिहासिक घोषणा करत गणेशोत्सवाच्या महत्वाला राज्यशासनाने दिलेला मान अधिक दृढ केला आहे.

गणेशोत्सवाची सुरुवात १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी सामाजिक जागृती व राष्ट्रीय एकतेच्या उद्देशाने केली होती. आजही हा उत्सव केवळ धार्मिक मर्यादेत न राहता सामाजिक ऐक्य, भाषिक अभिमान, स्वातंत्र्याचे प्रतीक आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे.

राज्यातच नव्हे तर देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही गणेशोत्सवाची ओळख, प्रभाव आणि लोकप्रियता वाढवण्याचा निर्धार सरकारने व्यक्त केला आहे. गणेशोत्सवाच्या परंपरेला अडथळा आणणाऱ्या विविध याचिकांवर निर्णय देताना राज्य सरकारने ठाम भूमिका घेत, न्यायालयीन स्पिड ब्रेकर्स दूर करण्याचे कार्य जलदगतीने पूर्ण केले असल्याचे शेलार यांनी नमूद केले.

पीओपी (POP) मूर्त्यांवर लावण्यात आलेल्या निर्बंधांबाबतही सरकारने संतुलित आणि वैज्ञानिक दृष्टिकोन घेतला आहे. पर्यावरणपूरक पर्यायांचा विचार करून, पीओपी मूर्त्यांचा सखोल अभ्यास करण्यात आला. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या अहवालाच्या आधारे निर्णय घेत, केंद्रीय पर्यावरणमंत्रालयाच्या सहकार्याने मूर्ती उत्पादन, विक्री आणि प्रदर्शनासाठी परवानगी मिळवण्यात यश मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या सुरक्षिततेपासून इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत आवश्यक सर्व खर्च सरकार उचलणार असल्याचेही मंत्री शेलार यांनी सांगितले. पुणे, मुंबईसह राज्यभरात साजऱ्या होणाऱ्या उत्सवासाठी सरकारचा पूर्ण पाठिंबा असणार आहे.

गणेश मंडळांनी देखाव्यांमध्ये देशसेवा, संरक्षण दल, सामाजिक उपक्रम, ऐतिहासिक व्यक्तिरेखा व राष्ट्रीय विकासाचे विषय समाविष्ट करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला. “उत्साह, सामाजिक जाणीव आणि पर्यावरणपूरकतेचा संगम असलेला हा उत्सव आता महाराष्ट्राचा अधिकृत महोत्सव आहे,” असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.