| सांगली समाचार वृत्त |
सांगली - सोमवार दि. ७ जुलै २०२५
महाराष्ट्राच्या राजकीय पटावर गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरेंचं नाव केंद्रस्थानी आहे. आणि आता, दोन दशके वेगळे राहिल्यानंतर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येताच, राज्याच्या राजकारणात एक नवे पर्व सुरू झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
मनसे स्थापनेनंतर भिन्न मार्ग निवडलेले ठाकरे बंधू, आता एकाच मंचावर दिसल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हिंदी विषयक शासन निर्णय मागे घेण्यात आल्यावर, ठाकरेंच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'विजयी मेळाव्या'त दोघांनी एकत्र येऊन शक्तिप्रदर्शन केलं. या ऐतिहासिक क्षणाने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं.
या मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी पक्षातील प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मनसेतील कोणीही पदाधिकारी माध्यमांपुढे मत मांडण्याआधी राज ठाकरेंची स्पष्ट संमती घेणार असल्याचे समजते. राजकीय प्रतिक्रिया, मुलाखती किंवा कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यापूर्वी राज ठाकरे यांचा आढावा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.या निर्णयामुळे मनसेत शिस्तबद्ध संवादाची नवी परंपरा सुरू होणार असून, पक्षसंघटनेच्या भविष्यकालीन धोरणांमध्ये स्पष्टतेचा नवा टप्पा गाठला जात असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.