| सांगली समाचार वृत्त |
लातूर - शुक्रवार दि. ३ जुलै २०२५
दुधगावात १९०६ साली आण्णासाहेब लठ्ठेंचं ऐकलेले भाषण आणि १९०९ मध्ये कोल्हापूर येथील दक्षिण भारत जैन सभेच्या अधिवेशनातील उपस्थिती. या दोन्ही घटनांचा सकारात्मक परिणाम म्हणजे भाऊसाहेब कुदळे यांनी १९०९ मध्ये दुधगावात स्थापन केलेली दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ आणि संस्थेची आश्रमशाळा होय. या शाळेच्या वसतिगृहात सर्व जाती धर्माचे विद्यार्थी एकत्र राहून शिक्षण घेत होते. या संस्थेच्या कार्याने कर्मवीर भाऊराव पाटील प्रभावित झाले होते, असे प्रतिपादन प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले. ते दुधगाव येथे भ. पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदीरात आयोजित भाऊसाहेब कुदळे यांच्या १३५ व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मंदीर कमिटीचे अध्यक्ष देवेंद्र पाटील होते.
कर्मवीरांनी दुधगावातील वसतिगृहासाठी त्यावेळी देणगी देऊन परिसरातून धान्य गोळा करुन दिले होते. बहुजन समाज शिक्षणासाठी संस्था काढण्याच्या विचाराची प्रेरणा कुदळेनी दक्षिण भारत जैन सभेकडून घेतली आणि कुदळे यांच्या कार्याने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मनात रयत स्थापनेचा विचार रुजला. कुदळे यांचे शैक्षणिक कार्य हे रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेची मूळ प्रेरणा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग दुधगाव मधून जातो. हे भाऊसाहेब कुदळे यांचे न फिटणारे ऋण आहेत.
दोन भाऊसाहेबांनी महाराष्ट्र मोठा केला. जगा आणि जगू द्या हा जैन तत्वज्ञानाचा मूळ विचार हे या दोन्ही भाऊसाहेबांच्या कामाची प्रेरणा आहे. भाऊसाहेब कुदळे यांनी दक्षिण भारत जैन सभेचा महामंत्री म्हणून सभेचे प्रशासन आणि संघटन मजबूत केले. स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय राहून तुरुंगवास भोगला, दक्षिण सातारा जिल्हा(सध्याचा सांगली जिल्हा) स्कूल बोर्डाचा चेअरमन म्हणून जिल्ह्यात वाचनालये, ग्रामसुधार मंडळे व व्यायामशाळा काढल्या. सोसायट्या व ग्रामपंचायती स्थापन केल्या. चार वर्षे दुधगावचे संस्थापक सरपंच म्हणून गावचा चौफेर विकास केला. त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी म्हणून गेली २१ वर्षे दुधगाव त्यांची जयंती साजरी करुन त्यांना अभिवादन करतो, हा स्तुत्य उपक्रम आहे.
प्रा. बिरनाळे पुढे म्हणाले, दक्षिण भारत जैन सभेच्या वसतिगृहाचा उच्च शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी गावागावात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण प्रसार व्हावा म्हणून ग्रामीण भागात शाळांचे नेटवर्क मजबूत केले म्हणून गोरगरीब पालकांची मुलं शिकली आणि पुढे दक्षिण भारत जैन सभेच्या वसतिगृहात राहून उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी झाली. हेच काम आण्णासाहेब लठ्ठे करवीर संस्थानात करायचे. आण्णासाहेब लठ्ठे आणि दक्षिण भारत जैन सभा ही भाऊसाहेब कुदळे यांच्या जैन आणि जैनेतर समाज विकासाची प्रेरणा आहे. त्यामुळे वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी सांगितल्याप्रमाणे दक्षिण भारत जैन सभेच्या प्रवाहात जैन समाज मोठय़ा संख्येने येणं हे भाऊसाहेब कुदळे यांना खरे अभिवादन ठरेल.
गावात एकी हवी, शिक्षण, संस्कार आणि आरोग्य या सभेच्या त्रिसूत्रीला मदत करणं म्हणजे कुदळेंचे कार्य पुढे नेणे होय. सुसंस्कृत माणूस घडवणे, लोकांना जगण्याची हमी देणे, बेरोजगारांना काम देणे, महिलांचा सन्मान करणे आणि आपण भारतीय आहोत, भारत प्रथम हे भाऊसाहेब कुदळे यांचे विचार रुजवणे आवश्यक आहे. अशी अपेक्षा व्यक्त करुन प्रा. बिरनाळे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेमधून बहुजन समाज विकास करणारे दूरदृष्टीचे कर्तबगार नेते म्हणून त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे.
भाऊसाहेब कुदळे यांनी इस्लामपूर येथे प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांना विहारासाठी मामलेदारांनी घातलेली बंदी अभ्यासपूर्ण युक्तीवाद करुन उठवली. हैदराबाद संस्थानात जैन समाजावरील धर्मांतराचे संकट दूर करण्यासाठी औरंगाबाद येथे तत्कालीन नांदणी मठाचे भट्टारक पट्टाचार्य जिनसेनजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अखिल भारतीय जैन धर्म परिषदेत जैन धर्मावर अडीच तास भाषण करुन हैद्राबाद संस्थामध्ये जैन समाजाला दिलासा आणि कोल्हापूर संस्थानात खोट्या डांबर प्रकरणात अटक केलेल्या कर्मवीर भाऊराव पाटलांची सुटका या तीन घटना भाऊसाहेब कुदळे यांच्या कर्तबगारीच्या साक्षी आहेत.
यावेळी भाऊसाहेब कुदळे यांचे नातू महावीर आडमुठे यांनी दुधगावच्या हेरवाडे,आवटी, आडमुठे, कोले, लंबू पाटील आणि कुदळे या कुटुंबांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीचा गौरवपूर्ण उल्लेख करुन भाऊसाहेब कुदळेंचे रचनात्मक समाजकार्या नव्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे सांगितले. शिकलगार सरांनी स्वरचित कुदळे गौरव गीत गायले.
स्वागत व प्रास्ताविक अरुण कुदळे, पाहुणे परिचय दिपक अथणे व अत्यंत प्रभावी असे सूत्रसंचालन शोभा पाटील यांनी केले. आभार मनिषा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचा प्रारंभ व समाप्ती णमोकार मंत्राने झाली.
यावेळी कर्मवीर वाचनालयाचे विद्यासागर पाटील, किणीकर साहेब, रुपेश वाडकर, सुरेश कुदळे, कैलास आवटी, प्रकाश मगदूम, हेरवाडे व देशपांडे सर, दरेकर व वाडकर सर, गाजी मॅडम, सुवर्णा सांद्रे, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, मंदीर विश्वस्त, श्रावक- श्राविका,पाठशाळेचे विद्यार्थी व भाऊसाहेब कुदळे प्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या आयोजनात उज्ज्वला आडमुठे, अरुण कुदळे, विद्यासागर पाटील व दिपक अथणे यांचा सहभाग व मार्गदर्शन लाभले होते.