yuva MAharashtra पंढरपूर तालुक्यात संत ज्ञानेश्वर-सोपानदेव बंधूंची भावपूर्ण भेट; टप्पा येथे भक्तीमय सोहळ्याचा अनुभव

पंढरपूर तालुक्यात संत ज्ञानेश्वर-सोपानदेव बंधूंची भावपूर्ण भेट; टप्पा येथे भक्तीमय सोहळ्याचा अनुभव

| सांगली समाचार वृत्त |
लातूर - शुक्रवार दि. ३ जुलै २०२५

पंढरपूर | आषाढ शुद्ध एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असतानाच, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी माळशिरस मुक्कामानंतर पुढे सरकत टप्पा गावातून पंढरपूर तालुक्यात पदार्पण करताच वातावरण भक्तिमयतेने भरून गेले. याठिकाणी संत माऊलींची आणि त्यांच्या ज्येष्ठ बंधू संत सोपानदेव यांची ऐतिहासिक व भावस्पर्शी भेट मोठ्या भक्तिभावात पार पडली.

टप्पा येथे दोनही पालख्या समोरासमोर आल्यावर काही काळ त्या स्थिरावल्या आणि परंपरेनुसार परस्पर संस्थानांकडून मानाचा नारळप्रसाद अर्पण करत आदरभाव व्यक्त करण्यात आला. या प्रसंगाने हजारो भाविकांच्या डोळ्यांत श्रद्धेचा ओलावा तरळला.

या आधी, वेळापूरहून प्रस्थान घेतलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने ठाकूर बुवा समाधीस्थळी रंगतदार गोल रिंगण पार पाडले. टाळ, मृदुंग, विणा आणि भक्तीगीतांनी परिसर भारावून गेला होता. महिलांच्या सहभागाने रिंगण अधिक तेजस्वी बनले होते. यावेळी पालखी विश्वस्तांकडून संत सोपानकाकांच्या मानकऱ्यांना सन्मानाचा श्रीफळ अर्पण करण्यात आला.

बंधू भेटीनंतर संत माऊलींची पालखी पुढे निघत भंडीशेगाव येथे पुढील मुक्कामासाठी स्थिरावली.

दरम्यान, पंढरपूर नगरीत आषाढी यात्रेसाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. गोपाळपूरपर्यंत पसरलेल्या रांगेतून लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणस्पर्शासाठी वाट पाहत आहेत. २४ तास सुरु असलेल्या दर्शन व्यवस्थेमुळे आतापर्यंत ३ लाख भाविकांनी पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेतला असून, सुमारे २ लाखांहून अधिकांनी मुखदर्शन साधले आहे.

संत तुकाराम महाराजांची पालखी देखील बोरगाव येथून पुढे सरकत "तुका म्हणे धावा, आहे पंढरीस विसावा" या अभंगाचा जयघोष करीत पिराची कुरोली येथे रिंगण पार करून मुक्कामाला पोहोचली.

टप्पा येथे आगमन झालेल्या पालख्या आणि वारकऱ्यांचे पंढरपूर तालुका प्रशासनातर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, तसेच टप्पा व तोंडले-बाँडले येथील सरपंच आणि पंचायत समितीचे अधिकारी यांनी सर्व व्यवस्थेचे निरीक्षण करत यशस्वी आयोजनासाठी सज्जता दर्शवली.