yuva MAharashtra स्वतःला जुंपले नांगराला : लातूरच्या शेतकरी दाम्पत्याच्या सहाय्यार्थ शासनास सोनू सूद सरसावले

स्वतःला जुंपले नांगराला : लातूरच्या शेतकरी दाम्पत्याच्या सहाय्यार्थ शासनास सोनू सूद सरसावले



| सांगली समाचार वृत्त |
लातूर - शुक्रवार दि. ३ जुलै २०२५

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातून समोर आलेली एक हृदयद्रावक घटना सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. आर्थिक अडचणींमुळे बैल परवडत नसल्याने एका वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला नांगराला जुंपून शेतीची मशागत केली. त्यांच्या या संघर्षाचे दृश्य व्हिडिओच्या माध्यमातून समोर आल्यानंतर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद उमटला.

हाडोळती गावातील हे शेतकरी दाम्पत्य मागील पाच दशकांपासून शेती करत आहे. मात्र वाढती महागाई, घटती उत्पन्नं आणि साधनसामग्रीचा अभाव यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तब्बल ७५ वर्षांचे हे दाम्पत्य अजूनही दिवसरात्र शेतात राबत असून, शेती चालवण्यासाठी दोघांनी मिळून नांगर ओढण्याचा निर्णय घेतला. ही दुर्दैवी पण प्रेरणादायक झलक झी २४ तास या वृत्तवाहिनीने प्रसारित केली.
या व्हिडिओनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कृषी खात्याने या कुटुंबासाठी सवलतीच्या दरात कृषी उपकरणं उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असून, अधिकृत कागदपत्रांची नोंदणी देखील सुरू करण्यात आली आहे.

याच दरम्यान, अभिनेता सोनू सूद यांनी देखील या शेतकऱ्याच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी “त्यांचा संपर्क द्या, मी बैलांची व्यवस्था करतो” असा मनापासूनचा संदेश दिला.

या घटनेने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जिवघेण्या संघर्षाचे पुन्हा एकदा दर्शन घडवले आहे. सरकारकडून कर्जमाफीसह इतर मदतीच्या योजना तत्काळ राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.