फोटो सौजन्य : चॅट जीपीटी
| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. ३ जुलै २०२५
सांगली जिल्ह्यात गेल्या काही काळात खुनांच्या घटना चक्रवाढ पद्धतीने वाढत असून, बुधगाव (ता. मिरज) येथे पुन्हा एका व्यक्तीची हत्या झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात भीतीचे सावट पसरले असून, जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
झेंडा चौकात सकाळच्या शांततेला हादरा
बुधगावच्या झेंडा चौकात काल सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भररस्त्यात एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. सिकंदर मौला शिकलगार (वय ५२) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात रफिक मेहबुब पट्टेकरी (वय ५९, रा. वनवासवाडी, बुधगाव) या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
कामातून वाद, वादातून हत्येपर्यंत मजल
सिकंदर शिकलगार हे सेंट्रींगचे काम करत होते आणि रफिक पट्टेकरी त्यांच्याकडे मजूर म्हणून कार्यरत होता. दोघेही एकमेकांचे मित्र होते. काही दिवसांपूर्वी दोघे मिळून बुधगावमध्ये सुरू असलेल्या आरसीसी चेंबरच्या कामात सहभागी झाले होते. मात्र, नंतर पट्टेकरीने दुसरीकडे काम पत्करले, यावरून दोघांमध्ये कलह झाला.
काल रात्री या वादात मारहाणही झाली होती. शिकलगारने पट्टेकरीवर हात उगारला होता. याच रागातून आज सकाळी पट्टेकरीने चाकू हातात घेत झेंडा चौकात येत शिकलगारशी पुन्हा वाद घातला आणि क्षणात त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
घटनेनंतर थरार; आरोपी घटनास्थळीच
चाकूच्या घावांमुळे गंभीर जखमी झालेला शिकलगार जागीच कोसळला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात हलवले. मात्र उपचार सुरू असतानाच दुपारी बारा वाजता त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी पट्टेकरी घटनास्थळीच थांबलेला होता आणि पोलिसांनी त्याला अटक करत चौकशीसाठी ताब्यात घेतले.
पोलीस यंत्रणा सतर्क, वरिष्ठांची पाहणी
ही घटना समजताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय अधिकारी विमला एम. आणि निरीक्षक किरण चौगुले यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मृताच्या नातेवाईक शब्बीर रसुल शिकलगार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पूर्व इतिहासही रक्तरंजित
रफिक पट्टेकरी याच्यावर यापूर्वीही हल्ला झाल्याची नोंद आहे. त्यावेळी त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आला होता. तसेच त्याने देखील इतरांवर मारहाण केल्याचे गुन्हे पोलिस ठाण्यात नोंद आहेत.
सहा महिन्यांत ३४ हत्या – कायदा सुव्यवस्थेला हादरा
जिल्ह्यातील खुनांच्या मालिकेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३४ हत्यांचे प्रकार घडले आहेत. यामुळे पोलिस प्रशासन व स्थानिक यंत्रणेपुढे मोठे आव्हान निर्माण झाले असून, कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची चर्चा जनमानसात आहे.