yuva MAharashtra राज्यातील सरकार आर्थिक अडचणीत, संजय शिरसाट यांची धक्कादायक कबुली

राज्यातील सरकार आर्थिक अडचणीत, संजय शिरसाट यांची धक्कादायक कबुली



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शनिवार दि. १२ जुलै २०२५

राज्यात सत्तेवर असलेले महायुतीचे सरकार सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असल्याची स्पष्ट कबुली समाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. 'झी २४ तास' या वृत्तवाहिनीच्या ‘टू द पॉईंट’ या विशेष मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य करत सत्ताधाऱ्यांच्या अडचणींवर प्रकाश टाकला.

शिरसाट यांनी सांगितले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या अनेक वचनांची अंमलबजावणी करणे सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सरकारला कठीण जात आहे. विविध योजनांची अमलबजावणी आणि त्यांना निधीपुरवठा करणे हे सरकारपुढील मोठे आव्हान ठरले आहे. पुरेशा आर्थिक स्रोताअभावी प्रशासनिक कार्यांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

याच मुलाखतीत, निधी वाटपावरून सुरु असलेल्या वादांवरही शिरसाट यांनी परखडपणे भूमिका मांडली. "निधी देत असल्याचे आरोप झाले, पण प्रत्यक्षात निधी उभा करूनच दिला जात आहे," असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणेच आपल्या मित्रपक्षांनाही टोला लगावला. शिवाय, “सार्वजनिकरित्या बोलण्याचे परिणाम भोगावे लागतात,” अशी कबुली देत त्यांनी उघडपणे पक्षांतर्गत तणावाचाही उल्लेख केला.

संजय शिरसाट यांच्या या कबुलीमुळे सत्तेत असूनही सरकार आर्थिक अडचणीत असल्याचा सवाल उपस्थित झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महायुती सरकारच्या स्थैर्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.