| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. १२ जुलै २०२५
शिक्षणाचा अभाव, आर्थिक विषमता, प्रादेशिक विभाग, वकिलांची कमी संख्या इत्यादी कारणांमुळे तळगाळातील लोकांना कायद्याची माहिती नसते. कायद्याचे ज्ञान सर्वांना असणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणमार्फत राबविण्यात येणाऱ्या कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस प्रशासनामार्फत आयोजित कायदेविषयक जनजागृती मोहीम-2025 कार्यक्रमात ते बोलत होते.
मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी. जी. कांबळे, मनपा अतिरीक्त आयुक्त रवीकांत अडसूळ, मनपा उपायुक्त विजया यादव, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सांगलीच्या प्राचार्या डॉ. पूजा नरवाडकर आदि उपस्थित होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे म्हणाले, कायदा सर्वांना माहिती आहे असे गृहित धरले जाते. पण तो प्रत्यक्ष माहिती असणे हेही तितकेच महत्वाचे आहे. कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आता स्थानिक स्वराज्य संस्थांना यामध्ये सहभागी करुन घेण्यात येत आहे. कारण या संस्थांचा सर्व तळागाळातील लोकांसोबत संपर्क असतो. यासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत व पोलीस विभाग यांनी सहभागी होऊन पाम्प्लेट, बॅनर, समाजमाध्यम अशा विविध माध्यमांद्वारे कायदेविषयक योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असेही यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे म्हणाले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमातून कायद्याचे ज्ञान तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत होणार आहे. या जनजागृती कार्यक्रमामध्ये लोकांचा स्वयंसहभागही महत्वाचा आहे. कायद्यामध्ये सर्वांना समान हक्क असतात. त्यामुळे पीडितांना न्याय मिळण्यासाठी मदत होईल. या जनजागृतीमुळे विचारांमध्ये बदल होईल असे अपेक्षित आहे. यासाठी ग्राम व तालुका स्तरावर या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी कार्यवाही करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, प्रत्येकाला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी विधी सेवा प्राधिकरणमार्फत राबविण्यात येणारा कायदेविषयक जागृती कार्यक्रम महत्वाचा आहे. पोलीस विभागामार्फतही वेळोवेळी फौजदारी व दिवाणी कायद्यांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोविण्याचे काम केले जाते. आता नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून अस्तित्वात आले आहेत. या कायद्यांची माहितीही सर्वांनी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी प्राचार्या डॉ. पूजा नरवाडकर यांनी कार्यालयाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार प्रकरणी असणाऱ्या POSH कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, कायदा सर्वांना समान आहे. प्रत्येकासाठी विधी सेवा उपलब्ध आहे. हे संविधानाने दिलेला आपला हक्क दिला आहे. विधी सेवा प्राधिकरण हे राष्ट्रीय स्तरापासून ते तालुका स्तरापर्यंत उपलब्ध आहे. याचा सर्वसामान्य जनतेनी लाभ घ्यावा व कायद्याचे ज्ञान घ्यावे, असे ते यावेळी म्हणाले.