| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. १२ जुलै २०२५
सांगली – जिल्ह्यातील अंमली पदार्थांविरोधातील लढ्यास गती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली तर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या वेळी येणाऱ्या काळातील अमली पदार्थांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य संकटाचा विचार करता, सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपली भूमिका जबाबदारीने पार पाडावी, असा स्पष्ट संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
जिल्हाधिकारी काकडे यांनी सांगितले की, अमली पदार्थांच्या विळख्यात युवापिढी अडकू नये यासाठी शाळा, महाविद्यालय, आयटीआय व तंत्रनिकेतन यांसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये सातत्यपूर्ण जनजागृती मोहीम राबवावी. यामध्ये केवळ कार्यक्रम न भरता, प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली का याची खातरजमा करण्यासाठी विभाग प्रमुखांनी अचानक भेटी देण्याचे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या वागणुकीतील बदल लक्षात घेऊन आवश्यक समुपदेशनाची प्रक्रिया सुरू ठेवावी, असेही ते म्हणाले.
सद्यस्थितीत अमली पदार्थांविरोधात प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक प्रभावी स्वरूप देण्यासाठी ‘कोड ऑफ कंडक्ट’ तयार करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली. तसेच, एमआयडीसी परिसरातील सक्रिय व बंद कारखान्यांची तसेच मेडिकल दुकानदारांची नियमित तपासणी करून मासिक अहवाल सादर करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी बजावले. व्यसनमुक्तीसाठी चिकित्सा, उपचार व समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठीही कार्यवाही त्वरेने व्हावी, असे निर्देश दिले.
यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनीही संवाद साधला. त्यांनी सांगितले की, कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. इतर विभागांनी तयार केलेले माहितीपर व्हिडिओ व पोस्टर्स उपलब्ध करून दिल्यास, तेही या उपक्रमात उपयोगी ठरतील, असे त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते. यामध्ये एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजचे डॉ. राजकिरण साळुंखे, शासकीय रुग्णालयाचे डॉ. विभीषण सारंगकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या वसुंधरा बिरजे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांचा सहभाग होता.