| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - बुधवार दि. २ जुलै २०२५
स्पष्टवक्तेपणाची प्रतिमा जपणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा त्यांच्या ठसठशीत विधानांमुळे चर्चेत आले आहेत. नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना थक्क करणारे उद्गार काढले – "मी नोकरीस तयार आहे, पण दर महिन्याला दोनशे कोटी रुपये हवेत. कारण माझ्या डोक्याची किंमतच तेवढी आहे."
या विधानाच्या मागील विचार स्पष्ट करताना ते म्हणाले की, “फक्त विचार मोठा असला पाहिजे, ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’, पण त्यासाठी शिक्षण अत्यावश्यक आहे.”
कार्यक्रमादरम्यान त्यांनी सामाजिक समतेवरही रोखठोक भूमिका मांडली. “कोणताही माणूस त्याच्या जाती, धर्मामुळे मोठा होत नाही, तर त्याच्या अंगी असलेल्या कौशल्यांमुळे तो ओळख निर्माण करतो,” असे सांगताना त्यांनी सामाजिक विघटन करणाऱ्या प्रवृत्तींचा समाचार घेतला.
गडकरी पुढे म्हणाले, “माझ्या दारात रोज विविध जातीधर्माचे लोक येतात. पण मी स्पष्टपणे सांगतो – जो जातीबद्दल बोलेल, त्याला मी जोरदार लाथ मारतो.”
राजकारणात सक्रिय असतानाही त्यांनी अनेकदा समाजहिताचे विचार न डगमगता मांडले आहेत. “मला कोणाला मत द्यायचं आहे, हे मी विचारांवर ठरवतो, जातीवर नाही,” असे सांगून त्यांनी पुन्हा एकदा सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.