| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - बुधवार दि. २ जुलै २०२५
न्यू एज्युकेशन सोसायटीने गेल्या ८५ वर्षात बहुजन समाजातील लेकरांचे नशीब घडवले आहे. या संस्थेच्या शाखांनी असंख्य विद्यार्थ्यांना स्वावलंबी व स्वाभिमानी बनवले आहे. छ. शिवाजी महाराज आणि भारतीय संविधानाचा सन्मान करणाऱ्या खासगी शिक्षण संस्थांमधून पदवीधर झालेल्या युवकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उडी घेऊन देश स्वतंत्र करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. अशा खासगी शिक्षण संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत. संस्था समस्यामुक्त झाल्या तर महाराष्ट्र समस्यामुक्त होतो. असे प्रतिपादन वाणीभूषण प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले. न्यू एज्युकेशन सोसायटीच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे दूरदृष्टी असलेले अध्यक्ष मा. शांतीनाथ कांते होते.
न्यू एज्युकेशन सोसायटीच्या प्रगतीसाठी अनेक सेवाभावी संस्थाचालक पदाधिकारी आणि देणगीदार यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. ही संस्था म्हणजे सांगलीची ज्योति- सावित्री आणि आभाळाचा खांब आहे. सरकारला जे जमले नाही ते खासगी शिक्षण संस्थांनी करुन दाखवले आहे, असे प्रा. बिरनाळे यावेळी म्हणाले.
प्रारंभी प्रतिमा पूजन आणि दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यींनीनी स्वागत गीत गायले. स्वागत व प्रास्ताविकात विठ्ठल मोहिते यांनी संस्थेचा संक्षिप्त इतिहास सांगितला.एका विद्यार्थीनीचे सत्कर्मावरील भाषण लक्षवेधी ठरले.
यावेळी प्रा. बिरनाळे यांनी बापूसाहेब दफ्तरदार, बापूसाहेब परांजपे, गुंडाप्पाण्णा व शांतीनाथ कांते, कुलकर्णी, खाडीलकर, आरवाडे, दडगे, भिडे, बोंद्रे, डॉ. सुरेश पाटील, बागल, तात्या मास्तर, वसंत हेबाळकर, दुधाने व अन्य माजी पदाधिकारी व सेवकांच्या य योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करुन देणगीदार, संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने संस्थेचा विकास झाल्याचे नमूद केले. शिक्षण क्षेत्रातील नवी आव्हाने पेलण्यासाठी सेवकांनी झोकून देऊन काम करावे. संस्था ही आपली भाकर, अस्तित्व व अस्मिता आहे. संस्थेशी एकनिष्ठ रहा, असे आवाहन त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर वर्गाला केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. बिरनाळे म्हणाले की, कायम विद्यार्थी रहा. संशोधन करा. अध्यापनात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. संदर्भ ग्रंथ वापरा. वाचन, लेखन आणि पालक संपर्क करा.. समाज व संस्थेचा दुवा बना, पदाधिकारी व वरिष्ठांचा आदर करा. अध्ययन व अध्यापन आनंददायी करा. गुणांपेक्षा गुणवत्ता महत्वाची आहे. आपला विद्यार्थी आदर्श माणूस बनला पाहिजे, विद्यार्थ्यांचे मित्र, मार्गदर्शक व गाईड बना, शाळा आणि संस्था समाजाला जोडण्यासाठी न्यू एज्युकेशन सोसायटी आपल्या दारी हा उपक्रम राबवा, पालकांच्या घरी संवाद साधा. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घ्या. कौशल्य विकास अभ्यासक्रम राबवा, मा. शांतीनाथ कांते हे बलाढ्य अशा लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची दमदार वाटचाल होणार आहे. त्यांना साथ द्या असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात मा. शांतीनाथ कांते म्हणाले, 'संस्थेचे काम हे टिम वर्क असते. संचालक मंडळाच्या व सेवकांच्या सहकार्याने संस्थेची प्रगती होत असते. अनेक जुन्या पदाधिकारी व संचालक आणि सेवकांनी संस्थेचा विकास केला आहे. यापुढे आपण सर्वांनी मिळून संस्थेचा संख्यात्मक व गुणात्मक विकास करु या. अनेक अडचणीवर मात करत संस्थेने बहुजन समाज शिक्षणाचे पवित्र कार्य उभे केले आहे. सेवकांनी सकारात्मक राहून गुणात्मक विकास करावा.
आभार मुख्याध्यापक सुहास कोळी यांनी मानले. अत्यंत दर्जेदार सूत्रसंचालन विठ्ठल मोहिते यांनी केले. यावेळी अध्यक्ष शांतीनाथ कांते, कार्यवाह डॉ. मोहन दडगे, संचालक श्रीमती विजया पाटील, श्रीप्रसाद चौगुले, योगतज्ज्ञ डॉ. हेमंत पाटील, सुरेंद्र पाटील, बिरु एडके, प्रा. राजेंद्र मेंच, पंकज आळवेकर, शिक्षक प्रतिनिधी राजकुमार हेरले,शाळा समिती सदस्य अक्षय बोंद्रे, स्वप्नील सुर्यवंशी राजेश कारंडे, सूरज आळगे, मुख्याध्यापक दिलीप पवार, सुहास कोळी,सुवर्णा गायकवाड, भारती जितकर, सीमा दडगे, गीतांजली आसगावकर, पर्यवेक्षिका गीता वायचळ व सर्व शाखांचा स्टाफ व विद्यार्थीनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.