yuva MAharashtra रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

             
                 फोटो सौजन्य : फेसबुकवॉलवरुन

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - बुधवार दि. २ जुलै २०२५

महाराष्ट्र भाजपच्या नेतृत्वात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून एकमुखाने निवड झाली असून पक्षसंघटनेने त्यांच्या अनुभवाला आणि कार्यशक्तीला मान्यता दिली आहे.

रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द कुठल्याही पारंपरिक राजकीय पाठबळाविना सुरू झाली. विचारधारेशी निष्ठा, अपार मेहनत आणि न थकणारी जिद्द या जोरावर त्यांनी कार्यकर्त्यापासून प्रदेशाध्यक्षपदापर्यंतचा प्रवास घडवला आहे. संवादकौशल्य, प्रशासनाची समज, आणि संघटनक्षमता हे त्यांच्या नेतृत्वाचे प्रमुख गुण आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेपासून विधानसभेपर्यंत आणि तिथून मंत्रीपद व प्रदेशस्तरीय जबाबदाऱ्या यापर्यंतच्या वाटचालीत त्यांनी ठसा उमटवला आहे. कोकण परिसरातील पक्षवाढीत त्यांचे योगदान लक्षणीय राहिले आहे. आता प्रदेशाध्यक्षपदाच्या माध्यमातून कोकणातील भाजप अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा पक्षात व्यक्त होत आहे.

समाजकारणाची वर्दळीपासून दूर राहून ते शांतपणे कार्यरत राहिले. राजकारणात त्यांनी पक्षनिष्ठेला सर्वोच्च मान दिला असून, 'राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि शेवटी स्वतः' या तत्त्वाशी ते कायम ठाम राहिले.
राष्ट्र सेवेसाठी कटिबद्ध असलेल्या संघाच्या विचारांचा ठसका त्यांच्या कामकाजात दिसतो. प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षसंघटनेला नवी दिशा आणि ऊर्जा देण्यासाठी त्यांची निवड निर्णायक ठरेल, असा विश्वास पक्षातील वर्तुळात व्यक्त होत आहे.