| सांगली समाचार वृत्त |
कडेगाव - सोमवार दि. १४ जुलै २०२५
कधी नव्हे इतक्या उमेदीनं प्रेमात रंगलेली आणि लग्नाचे स्वप्न मनात जपणारी करिष्मा तुपे या १९ वर्षीय तरुणीने आयुष्याच्या समोर आलेल्या कटू वास्तवाला सामोरं जात, गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात ही हृदय हेलावणारी घटना उघडकीस आली आहे.
प्राथमिक माहितीमधून समोर आले आहे की, करिष्मा आणि सचिन तवर (वय २१) यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये निकट संबंध निर्माण झाले होते आणि सचिनने तिला लग्नाचे वचनही दिले होते. मात्र ऐनवेळी सचिनने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. या नकाराने करिष्माच्या मनावर खोल आघात झाला. तिच्या स्वप्नांचा, विश्वासाचा आणि आयुष्याच्या पुढील वाटचालीचा डोलारा अक्षरशः कोसळून पडला.
करिष्माने मानसिक तणावात राहून अखेर घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. तिच्या वडिलांनी—अमोल केशव तुपे यांनी या प्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी त्वरित कारवाई करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सचिन तवरला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधिक तपास करत असून, मोबाईल संवाद, सामाजिक माध्यमांवरील संवाद, वादाच्या कारणांची सखोल चौकशी सुरू आहे.
या प्रकरणामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका निष्पाप जीवाने केवळ प्रेमात मिळालेल्या दगाफटक्यामुळे जगाचा निरोप घेतल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
"प्रेमात विश्वास तुटला... आणि एका तरुणीचं आयुष्यच हरवलं..." पण, करिष्माने इतके टोकाचे पाऊल उचलायला नको होते, अशीही चर्चा सर्वत्र सुरू आहे...