| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - बुधवार दि. २३ जुलै २०२५
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. काही दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या अधिवेशनात शेतकऱ्यांबाबत चर्चा सुरू असताना ‘रमी’सारखे खेळ खेळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्यांनी पीक विम्यावर केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड द्यावे लागत आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी कोकाटे यांनी ‘कृषी समृद्धी योजना’ सुरू करण्याची घोषणा केली. पुढील पाच वर्षांत या योजनेंतर्गत २५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले. ही घोषणा करताना कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत पीक विम्याविषयी बोलताना एक वादग्रस्त टिप्पणी केली. ते म्हणाले, "सरकार शेतकऱ्यांकडून फक्त १ रुपये घेतं, म्हणजे सरकार भिकारी ठरतं, शेतकरी नाही."
या वक्तव्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाचा निषेध करत, अशा प्रकारची भाषा मंत्र्यांनी वापरू नये, अशी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच, कोकाटे यांनी पीकविमा योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर बोगस अर्ज सापडल्याची माहिती दिली. "सुमारे पाच ते साडेपाच लाख अर्ज फसव्या स्वरूपाचे आढळले आहेत, जे आम्ही रद्द केले असून, नव्या सुधारणांसह पुढील निर्णय घेण्यात येत आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.