yuva MAharashtra सांगली सिव्हिल रुग्णालयाच्या सुधारित प्रस्तावाला गती देण्याची मागणी — पृथ्वीराज पाटील

सांगली सिव्हिल रुग्णालयाच्या सुधारित प्रस्तावाला गती देण्याची मागणी — पृथ्वीराज पाटील

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. २३ जुलै २०२५

सांगली  शहरातील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात रुग्णांना अद्ययावत सुविधा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बेडची कमतरता, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा अभाव आणि मूलभूत सोयींची मागणी लक्षात घेता, येथील ५०० खाटांच्या नव्या रुग्णालयाच्या प्रस्तावास तातडीने मान्यता मिळवून देण्याची आवश्यकता आहे, असा ठाम आग्रह काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे व्यक्त केला.

पाटील यांनी मिरज येथे झालेल्या बैठकीत सांगली सिव्हिलच्या दैनंदिन समस्यांबाबत सविस्तर माहिती देत सुधारित अंदाजपत्रकाला लवकर मंजुरी मिळावी, यासाठी पाठपुरावा केला. या नव्या प्रस्तावाचा खर्च ४४२ कोटी रुपयांवर पोहोचला असून, तो सध्या उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेअंतीत आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात ५०० खाटांचे हे रुग्णालय सुरुवातीला २३३ कोटी रुपयांत मंजूर झाले होते.

पृथ्वीराज पाटील म्हणाले की, “सांगली सिव्हिल रुग्णालयात रुग्णसंख्येनुसार सुविधा अपुऱ्या आहेत. अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. एमआरआय आणि सोनोग्राफीसाठी अत्यावश्यक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्यामुळे निदान प्रक्रियेला विलंब होतो. यासाठी निधीची मागणी केली आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या इमारतींची तातडीने डागडुजी करावी.”

रुग्णालयात कर्मचारी अपुरे असल्याने वैद्यकीय सेवा अडचणीत आली आहे. डॉक्टर्ससह वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा तात्काळ भराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. २०२१ मध्ये झालेल्या विद्युत तपासणी अहवालावर अद्याप कोणतेही ठोस कृती न झाल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, “वर्ग चार कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता व मूलभूत सेवा घेतल्या जातात. त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढीला वारसा हक्कातून नोकरीची संधी मिळावी, अशी सहानुभूतीपूर्वक विनंतीही केली असून, याबाबत शासन धोरणाच्या चौकटीत सकारात्मक विचार व्हावा, ही अपेक्षा आहे.”