yuva MAharashtra दिल्लीमध्ये जयंत पाटील आणि प्रतीक पाटील यांचा भव्य सत्कार; साखर उद्योगातील योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल

दिल्लीमध्ये जयंत पाटील आणि प्रतीक पाटील यांचा भव्य सत्कार; साखर उद्योगातील योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल

| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - शुक्रवार दि. २५ जुलै २०२५

नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या एका प्रतिष्ठित सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांना 'लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2025' देऊन गौरविण्यात आले. 'द शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया (STAI)' तर्फे साखर क्षेत्रातील दीर्घ आणि उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्याचप्रमाणे, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन प्रतीक पाटील यांना 'इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड 2025' देण्यात आला. दोघांनाही मिळालेल्या या पुरस्कारांमुळे राजारामबापू साखर कारखान्याचा नावलौकिक आणखी वृद्धिंगत झाला आहे.

सहकार चळवळीतील एक ठसा 

इस्लामपूर, सांगली जिल्ह्यात 1969 मध्ये स्थापन झालेला राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगातील एक प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. 1970 पासून उत्पादन सुरू झालेल्या या कारखान्याच्या प्रगतीमागे स्व. राजारामबापू पाटील यांचे कुशल नेतृत्व कारणीभूत ठरले. त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी मंत्री जयंत पाटील यांनी समर्थपणे पार पाडली. तब्बल दहा वर्षे कारखान्याच्या चेअरमनपदावर कार्यरत राहून त्यांनी कारखान्याचा पाया अधिक भक्कम केला.

नव्या पिढीकडे नेतृत्व सोपवताना जयंत पाटील यांनी आपल्या सुपुत्र प्रतीक पाटील यांच्यावर विश्वास दाखवला. प्रतीक पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत यश मिळवून, प्रभावी नेतृत्वाची छाप पाडली आहे. एकेकाळी एका युनिटपुरता मर्यादित असलेला हा कारखाना आज चार कार्यरत युनिट्ससह आधुनिक यंत्रणा आणि कार्यक्षम व्यवस्थापनाच्या बळावर राज्यात अग्रक्रमावर आहे.

या गौरवाबाबत प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, “हा पुरस्कार माझ्या वैयक्तिक वाटचालीचा नाही, तर कारखान्यात रात्रंदिवस परिश्रम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा सन्मान आहे.”