| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. २५ जुलै २०२५
सांगली जिल्ह्यातील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येने राज्यात खळबळ उडाली असून, या पार्श्वभूमीवर राज्यभरातील कंत्राटदारांनी आपला रोष व्यक्त करत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. थकीत देयके न मिळाल्याने कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी असून, सरकारला इशारा देण्यात आला आहे की, देयकांची तातडीने पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.
सांगलीत बैठकीत आंदोलनाचा निर्णयसांगलीत कंत्राटदार संघटनांच्या वतीने हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र येत शोकसभा पार पडली. यावेळी राज्यातील हजारो कंत्राटदारांची थकीत बिले ही मुख्य चर्चा ठरली. सरकारकडून प्रलंबित देयके मिळेपर्यंत सर्व सरकारी कामे थांबवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ही कृती म्हणजे केवळ निषेध नसून, सरकारच्या दुर्लक्षाविरोधात एकजूट दाखवणारा निर्धार आहे.
जालना जिल्ह्यातील कंत्राटदारांचा सामुहिक आत्मदहनाचा इशारा
दरम्यान हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर जालना जिल्ह्यातील कंत्राटदारांनीही संताप व्यक्त केला आहे. सुमारे ४०० कोटी रुपयांच्या थकीत बिलांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी १५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. सरकारकडून वेळोवेळी निविदा मागवून कामे दिली जात असताना, कंत्राटदारांना पैसे न मिळणे हा दुजाभावाचा प्रकार असल्याची तीव्र भावना व्यक्त करण्यात आली.
"छोट्या कंत्राटदारांना दडपलं जातं, शासनाच्या धोरणांवर रोष"
शासन मोठ्या निविदा काढून राजकीय लाभ घेत असताना, छोट्या व मध्यम स्तरातील कंत्राटदारांना आर्थिक संकटात लोटले जात आहे, असा आरोप या आंदोलनातून स्पष्ट होतो. "नेते गुवाहाटीला जाऊ शकतात, पण आम्हाला आमचेच पैसे मागण्यासाठी संघर्ष करावा लागतो," अशी प्रतिक्रिया अनेक कंत्राटदारांनी दिली.