yuva MAharashtra सांगली महापालिकेतील वीजबिल गैरव्यवहार प्रकरण गाजले; आयुक्तांपासून अनेकांची अडचण वाढणार!

सांगली महापालिकेतील वीजबिल गैरव्यवहार प्रकरण गाजले; आयुक्तांपासून अनेकांची अडचण वाढणार!

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. १० जुलै २०२५

सांगली महापालिकेच्या पथदिव्यांच्या वीजबिलांमध्ये तब्बल १ कोटी २९ लाख ९५ हजार रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर आला आहे. राज्याचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत या प्रकरणावर भाष्य करत स्पष्ट केले की, कोणीही दोषी आढळल्यास, मग ते आयुक्त शुभम गुप्ता असोत वा अन्य अधिकारी, कडक कारवाई अटळ असेल.

ही चौकशी विशेष तपास पथकाच्या (SIT) मार्फत सुरू असून, सदाभाऊ खोत यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. प्रसाद लाड आणि परिणय फुके यांनीही चर्चेत सहभाग नोंदवला.

चौकशीदरम्यान महत्त्वाचा खुलासा पुढे आला आहे – महावितरणकडे महापालिकेने ९ कोटी ८८ लाख ६६ हजार रुपयांचा धनादेश दिला असतानाही, प्रत्यक्षात महापालिकेचे वीजबिल होते केवळ ८ कोटी ८५ लाख ७० हजार रुपये. उर्वरित सुमारे १ कोटी रुपयांची रक्कम खासगी ग्राहकांच्या वीजबिलासाठी वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांचे नाव स्पष्टपणे तपासात पुढे आले आहे. तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या SIT मध्ये पोलिस निरीक्षक, चार्टर्ड अकाउंटंट आणि तत्कालीन उपायुक्त वैभव साबळे यांचा समावेश होता. मात्र तपास सुरु असतानाच साबळे स्वतः लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले, आणि त्यांनी संबंधित प्रकरणात लाच घेतली होती, ज्याचा संभाव्य दुवा सांगलीचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाचा संपूर्ण अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महापालिकेच्या निधीतून खासगी वीजबिलांची भरपाई झाल्याने, महापालिकेतील तसेच बँकेतील काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचाही प्राथमिक अंदाज SIT कडून व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केले की, दोषींवर कोणतीही माफकता न ठेवता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि ही कारवाई केवळ निवडून दिलेल्या अधिकाऱ्यांवर मर्यादित न राहता, या भ्रष्ट साखळीत सामील असलेल्या प्रत्येकावर केली जाईल.