| सांगली समाचार वृत्त |
हारुगिरी - सोमवार दि. २१ जुलै २०२५
दक्षिण भारत जैन सभेच्या १०३ व्या त्रैवार्षिक अधिवेशनाचा भव्य प्रारंभ हारुगिरी (कर्नाटक) येथील आदिनाथ समुदाय भवन येथे प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक व लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी यांच्या पवित्र उपस्थितीत झाला. या दिवशी अध्यात्म, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक उर्जेचा संगम पहायला मिळाला.
ध्वजारोहणाचा शुभारंभ डी.सी. सदलगे यांच्या हस्ते पार पडला. पारीसा उगारे यांच्या हस्ते श्रावकरत्न स्व. रावसाहेब पाटील (दादा) नगराचे उद्घाटन झाले. जिनाप्पाण्णा अस्की यांनी प्रवेशद्वाराचे उद्घाटन केले, तर शांतिपीठाचे लोकार्पण इरगोंडा धुळगोंडा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमात दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदाचा शपथविधी सोहळा साजरा झाला. भालचंद्र पाटील यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. दीपप्रज्वलनाचा मान डॉ. महावीर दानिगौंडा यांना देण्यात आला. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांची विधिवत पूजा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देखील भालचंद्र पाटीलच होते.
कार्यक्रमात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आमदार गणेश हुक्केरी यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धुळगोंडा पाटील यांनी केले. प.पू. जिनसेन महास्वामीजींनी अध्यक्षपदाची औपचारिक निवड जाहीर केली. त्यानंतर लक्ष्मीसेन स्वामीजींनी नवे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करत शुभाशीर्वाद दिले.
आमदार गणेश हुक्केरी यांनी आपल्या भाषणात जैन धर्माच्या अहिंसात्मक आणि त्यागमूल्यांना उजाळा देत शासनामार्फत ५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. त्यांनी दोन एकर जागा उपलब्ध करून बांधकामाचे कार्य लवकरच सुरू होईल, असे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात भालचंद्र पाटील यांनी स्व. रावसाहेब पाटील (दादा) यांच्या प्रेरणेमुळेच आपल्याला ही जबाबदारी मिळाल्याचे सांगत, आपल्या कार्यकाळात पारदर्शकता व सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्धार व्यक्त केला. "दादांच्या मार्गावर चालत समाजहितासाठी कटिबद्ध राहीन," असे ते म्हणाले.
स्वागताध्यक्ष उत्तम पाटील यांनी सर्व आगंतुकांचे मन:पूर्वक स्वागत करत हारुगिरी कमिटीच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मल्लाप्पा कानहट्टी यांनी केले.
दुपारच्या सत्रात विविध उपघटकांचे अधिवेशनही पार पडले. यात जैन महिला परिषद, वीर महिला मंडळ, वीर सेवा दल आणि पदवीधर संघटनांच्या अधिवेशनांचा समावेश होता. अनुक्रमे ३५वे, ७वे, १४वे आणि ११वे अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी प.पू. जिनसेन महास्वामीजींनी आपल्या भाषणात मठाच्या वतीने पंडित प्रशिक्षण सुरु होणार असल्याची घोषणा केली. तर लक्ष्मीसेन स्वामीजींनी शांतीसागर आर्य परंपरेच्या जतनासाठी सभेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमास दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी, विविध विभागीय शाखांचे प्रतिनिधी, श्रावक-श्राविका आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, यामुळे अधिवेशनाचे वातावरण आध्यात्मिक, प्रेरणादायी आणि ऐक्यपूर्ण झाले.