| सांगली समाचार वृत्त |
सांगली - सोमवार दि. २१ जुलै २०२५
आगामी सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारीचा बिगुल फुंकला असून, पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी निवडणुकीपूर्व रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. शनिवार, १९ जुलै रोजी त्यांनी संपूर्ण दिवस सांगलीत भाजपच्या माजी विजयी आणि पराभूत उमेदवारांसह, तसेच मंडल अध्यक्षांशी थेट संवाद साधत सत्तापरत्वे आवश्यक दिशा-दर्शन केले.
या बैठकीत प्रत्येक प्रभागात संघटनात्मक मजबुती कशी साधायची, भाजपच्या कार्याचा विस्तार कसा करायचा आणि स्थानिक प्रश्नांवर मतदारांशी जोड कशी निर्माण करायची, यावर दादांनी सखोल चर्चा केली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपले अनुभव, अडचणी आणि सुचना मांडल्यावर दादांनी सविस्तर मार्गदर्शन करत पुढील कृती आराखडा स्पष्ट केला.
विशेष म्हणजे, येणाऱ्या निवडणुकीत भाजप-महायुतीने किमान ६० जागांवर विजय मिळवावा, असा स्पष्ट निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी युद्धपातळीवर तयारीला लागावे, असा स्पष्ट संदेश चंद्रकांत दादांनी दिला.
या संवादादरम्यान जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग हेही उपस्थित होते. आगामी काही दिवसांत कुपवाड आणि मिरज परिसरातील नगरसेवकांसह भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी दादा पाटील संवाद साधणार आहेत.
राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सांगली महापालिका क्षेत्रात भाजप-महायुती पुन्हा सत्तेवर येणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.