| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - मंगळवार दि. १ जुलै २०२५
हिंदी सक्तीसंबंधी राज्य शासनाने मागे घेतलेल्या शालेय आदेशानंतर, मराठी अस्मितेचा मुद्दा ठळकपणे पुढे आला. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून निर्माण झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
ते म्हणाले, "मी असा कोणताही शासन निर्णय काढलेला नाही की दोन भाऊ एकत्र यायचं नाही. त्यांना भेटायचं, खेळायचं, एकत्र जेवायचं असेल तर नक्की करावं — त्यावर आमचा कुठलाच आक्षेप नाही."
त्याचबरोबर त्यांनी विरोधकांवर दुटप्पीपणाचा आरोप करत म्हटलं, "जे लोक आज हिंदीला विरोध करत आहेत, त्यांनीच आपल्या सत्ताकाळात हिंदीसाठी शिफारस करणारे अहवाल स्वीकारले होते. त्यावेळी कुणालाच मराठीची आठवण झाली नव्हती का?"
राज्यात त्रिभाषा धोरण लागू करावं की नाही, यावर चर्चा सुरू असून त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. “राजकीय पक्षांच्या अपेक्षांपेक्षा विद्यार्थ्यांचे भवितव्य आमच्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता योग्य निर्णय घेतला जाईल,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.