| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १ जुलै २०२५
पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आषाढी वारीदरम्यान पथकरातून सूट मिळावी यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे विशेष पास सेवा सुरु करण्यात आली आहे. भाविक आणि वारकऱ्यांनी ही सुविधा सहज उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी आपल्या वाहनाचे वैध नोंदणी कागदपत्र घेऊन संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष भेट द्यावी. यामुळे नियोजित मार्गावरील पथकर नाके – जसे की सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील – येथे पथकर भरावा लागणार नाही.
ही सवलत फक्त १८ जून २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत लागू राहणार असून, पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीच्या मानाच्या पालख्या तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या भाविकांच्या हलक्या आणि जड वाहनांनाच ही मुभा देण्यात येणार आहे. शासन परिपत्रकानुसार यासाठी विशिष्ट नमुन्यात सवलत प्रवेशपत्र तयार केले गेले असून, त्याचे वितरण सुरू आहे.