| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - गुरुवार दि. ३ जुलै २०२५
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना राजकीय वातावरणात नवचैतन्य जाणवत आहे. सत्ताधारी महायुतीत हालचालींना वेग आला असून पक्षांतर्गत इनकमिंगचं प्रमाण वाढताना दिसत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दाखल झाले आहेत.
नाशिकमध्ये नुकताच त्यांनी शिवसेना (ठाकरे गट)ला जबर धक्का दिला आहे. अनेक प्रभावशाली नेत्यांनी ठाकरे गटाचा निरोप घेत भाजपकडे पाठ फिरवली आहे. ही घडामोड ताजी असतानाच महाजन यांनी काँग्रेसमध्येही अस्वस्थता वाढल्याचे सूचित करत महत्त्वाचं विधान केलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, "विधानभवन परिसरात काँग्रेसचे काही आमदार आमच्याशी स्वतःहून संपर्क साधत आहेत. त्यांच्या मनात नाराजी आहे आणि ते बोलून दाखवत आहेत." यामुळे विरोधी पक्षातील एकात्मतेला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाजन यांनी पुढे नमूद केलं की, "लवकरच काही आमदार व खासदारांबाबत मोठ्या राजकीय हालचाली पाहायला मिळतील. काही तांत्रिक अडथळे आहेत, पण त्यांचेही निराकरण केले जाणार आहे." त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
ते म्हणाले की, "पक्षप्रवेश करणाऱ्यांसाठी स्थानिक नेतृत्वाशी समन्वय ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने प्रक्रिया राबवली जात आहे, कोणताही वाद निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे."
याआधीही भाजपने अशा पद्धतीने अनेक आमदारांना आपल्या गोटात खेचत राज्यातील राजकीय गणितं बदलली आहेत. त्यामुळे गिरीश महाजन यांचा सध्याचा आक्रमक पवित्रा ही केवळ सूचना नसून, महत्त्वाच्या राजकीय 'ऑपरेशन'ची सुरुवात असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.