फोटो सौजन्य : alamy.com
| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - गुरुवार दि. ३ जुलै २०२५
सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या ऐतिहासिक गावात नागपंचमीच्या दिवशी जीवंत नागांची पूजनपरंपरा पुन्हा सुरू करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. यासंदर्भात येत्या आठवड्यात केंद्रीय वनमंत्र्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित करत आमदार सत्यजित देशमुख, जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी नागपंचमीच्या पारंपरिक पूजापद्धतीवर न्यायालयीन बंदीमुळे निर्माण झालेल्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केला. बत्तीस शिराळ्यात अनेक पिढ्यांपासून चालत आलेली ही परंपरा असून, जलीकट्टू आणि बैलगाडा शर्यतीप्रमाणे या धार्मिक प्रथेलाही कायदेशीर संरक्षण देण्याची मागणी त्यांनी मांडली.
सद्यस्थितीत जीवंत सर्पपूजेस न्यायालयीन आदेशांनुसार बंदी आहे. मात्र, स्थानिक जनतेच्या भावना आणि सांस्कृतिक परंपरेचा विचार करता, विशेष बाब म्हणून नागपंचमीच्या पारंपरिक स्वरूपास परवानगी मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
ही बैठक पार पडल्यास, बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी उत्सवाला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक परंपरा आणि वन्यजीव संरक्षण यामधील संतुलन साधत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.