| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - शुक्रवार दि. २५ जुलै २०२५
राज्याच्या सत्तेच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध व्हिडिओंमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कधी आमदारांमध्ये चाललेली वादावादी, तर कधी बॅगभर रोकड उघड करणारे चित्रफिती समोर येत आहेत. याचदरम्यान, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मोबाईलवर रम्मी खेळतानाचा एक व्हिडिओ देखील चांगलाच गाजला आहे. विरोधकांनी या सर्व प्रकरणांचा मुद्दा करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, पंढरपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज यांच्या नावाने पुरस्कार जाहीर करण्यात आला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली. "आम्ही सर्वजण एकाच टीममध्ये काम करत आहोत. जबाबदाऱ्या आणि पदं ही वरखाली होतच असतात," असे सांगत त्यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना अप्रत्यक्षरित्या दुजोरा दिला.शिंदे पुढे म्हणाले, "सरकारचा मुख्य उद्देश जनतेसाठी काम करणे हाच आहे. खुर्चीपेक्षा जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण एकसंघ आहोत."
'लाडकी बहीण' योजनेमुळे सरकार अडचणीत येत असल्याच्या चर्चांवर उत्तर देताना शिंदे म्हणाले, “एसटी महामंडळाने एकत्रित बुकिंगवर दरवाढ केली होती. मी स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा करून ती वाढ तात्काळ मागे घेण्यास सांगितली आहे.”
विठ्ठल दर्शनाच्या निमित्ताने पंढरपूरच्या या दौऱ्यात शिंदे यांनी विठोबाच्या चरणी प्रार्थना करत शेतकरी, बळीराजा आणि वारकरी बांधवांच्या कल्याणासाठी आशीर्वाद मागितला. “आषाढी एकादशीला मुखदर्शन घेतलं होतं, पण आज विठ्ठलासमोर थोडा अधिक वेळ घालवता आला, हे माझं भाग्यच आहे,” असे मनोगतही त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात संत नामदेव महाराजांच्या ६७५व्या समाधी सोहळ्यानिमित्त अनेक वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराज मंडळींच्या उपस्थितीत शिंदे यांना गौरविण्यात आले.