| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - मंगळवार दि. ८ जुलै २०२५
यंदाची आषाढी वारी केवळ श्रद्धेचा महासागर ठरली नाही, तर ती एक ऐतिहासिक विक्रमाची नोंद बनली. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे सहा ते मध्यरात्र बारा या काळात तब्बल 27 ते 28 लाख भाविकांनी पंढरपुरात हजेरी लावल्याचे आकडे एआयच्या सहाय्याने समोर आले आहेत. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
वारीच्या दिवशी संपूर्ण पंढरपूर भाविकांनी भरून गेले होते. एकही मोकळी जागा नव्हती, आणि नजरेला दिसणारी प्रत्येक दिशा ही फक्त भक्तांनी व्यापलेली होती. यामुळे गेल्या अनेक वर्षांतील गर्दीचे सारे विक्रम यंदा मोडले गेले.
प्रशासनाने यंदा प्रथमच एआय आधारित ड्रोन तंत्रज्ञान वापरून गर्दीचे मोजमाप केले. चंद्रभागेच्या घाटापासून मंदिर परिसरापर्यंत आणि दर्शन रांगा व विविध प्रमुख मार्गांवर ड्रोनद्वारे निरीक्षण करून आकडे संकलित करण्यात आले.
वारीसाठी देशभरातून आणि राज्यभरातून आलेल्या भाविकांसाठी तब्बल पन्नास हजारांहून अधिक खाजगी वाहने — ट्रक, टेम्पो, कार — आणि सुमारे सहा हजार एसटी बस व 100 रेल्वे गाड्यांद्वारे आगमन झाले.
वाहतूक नियंत्रणातसाठीही एआयचा वापर
वारीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला अवघ्या सहा तासात 95 टक्के वाहने आणि भाविकांनी शहरातून गाशा गुंडाळला. यामागे ठोस वाहतूक नियोजनाचा वाटा होता. शहराबाहेर जाणाऱ्या सहा प्रमुख मार्गांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा बंदोबस्त तैनात होता.
एआयच्या मदतीने वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी झाल्याने कुठेही कोंडीची समस्या भासली नाही, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
माऊली पथकाची सतर्कता
वारीच्या काळात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली. एकेरी वाहतूक धोरणामुळे कोणतीही चेंगराचेंगरी झाली नाही. मंदिर परिसर, वाळवंट व प्रदक्षिणा मार्ग सर्वत्र शिस्तबद्ध गतीने भाविकांची हालचाल झाली.
यात्रेदरम्यान तब्बल 2,700 हरवलेले भाविक सुरक्षितपणे त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्यात आले. तसेच, गर्दीचा गैरफायदा घेणारे सुमारे 180 चोर माऊली पथकाच्या सतर्कतेमुळे ताब्यात घेण्यात आले.