| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - गुरुवार दि. १२ जून २०२५
तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलयं का? हृदयविकाराचा धोका डोळ्यासमोर उभा राहतोय का? मग आता काळजी दूर ठेवा. कारण संशोधकांनी एक असा उपाय शोधून काढला आहे जो शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलला थांबवण्यासाठी गेमचेंजर ठरू शकतो.
सतत औषधं घेण्याऐवजी, आता एका इंजेक्शनमुळे कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवणं शक्य होणार आहे. ‘VERVE-102’ नावाचं हे विशेष इंजेक्शन, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणाऱ्या जनुकावरच प्रभाव टाकतं आणि वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण झपाट्याने कमी करतं.
संशोधन काय सांगतं?
वैज्ञानिक चाचण्यांमध्ये VERVE-102 हे औषध 14 रुग्णांवर वापरून पाहण्यात आलं. ज्या रुग्णांना जास्त डोस देण्यात आला, त्यांच्यात वाईट कोलेस्ट्रॉलमध्ये तब्बल 69% घट नोंदवली गेली. मध्यम डोस घेतलेल्या रुग्णांमध्ये सरासरी 21% ते 53% पर्यंत घट आढळून आली. हे औषध थेट PCSK9 नावाच्या जनुकावर परिणाम करतं, ज्यामुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल तयार होणं कमी होतं.
हृदयासाठी दिलासादायक पाऊल
या औषधाच्या पुढील टप्प्यांतील चाचण्या यशस्वी झाल्यास, हृदयविकारग्रस्त रुग्णांसाठी VERVE-102 हे इंजेक्शन एक क्रांतिकारी पर्याय ठरू शकतो. रोजच्या गोळ्यांची गरज न पडता, केवळ एकाच डोसने वाईट कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.