| सांगली समाचार वृत्त |
टोकिओ - गुरुवार दि. १२ जून २०२५
आजच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) जग बदलत आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होत आहेत. अशातच जपानने वैद्यकीय क्षेत्रात एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे – कृत्रिम रक्त (Artificial Blood) तयार करून आरोग्य सेवेत नवे पर्व सुरू केले आहे.
AI च्या मदतीने आरोग्यसेवा अधिक सक्षम
रोज नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारत जपान आपल्या आरोग्य प्रणालीला अधिक गतिमान करत आहे. काही मिनिटांत रक्त तपासणीचा रिपोर्ट मिळवण्यावर काम सुरू असतानाच, जपानने आर्टिफिशियल ब्लड विकसित करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या कृत्रिम रक्ताचा वापर आपत्कालीन परिस्थितीत रक्तसंकट टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो.
संशोधनामागचे प्रयत्न
जपानच्या नॅशनल डिफेन्स मेडिकल कॉलेजसह अनेक संशोधन संस्थांनी मिळून या आर्टिफिशियल ब्लडचे संशोधन केले. 2023 मध्ये या प्रकल्पासाठी क्लिनिकल चाचण्या सुरू करण्यात आल्या होत्या. नारा मेडिकल युनिव्हर्सिटीने याबाबत प्राथमिक माहिती दिली होती. आता त्या संशोधनाला यश मिळालं असून, प्रत्यक्षात कृत्रिम रक्त तयार करण्यात आले आहे.
2030 पर्यंत व्यावसायिक वापराचे लक्ष्य
2030 पर्यंत या कृत्रिम रक्ताचा वैद्यकीय वापर प्रत्यक्षात आणण्याचा जपानचा निर्धार आहे. विशेषतः जपानमध्ये वाढत्या वृद्ध लोकसंख्येमुळे रक्तपुरवठ्यावर मोठा ताण आहे. 2024 मध्ये जपानमध्ये 65 वर्षांहून अधिक वयाचे तब्बल 3.62 कोटी नागरिक होते, जे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 29.3% आहेत. यामुळे रक्तदानासाठी पात्र तरुणांची संख्या कमी होत आहे.
कृत्रिम रक्ताची गरज का भासली?
जपानमधील वृद्धांमध्ये रक्तदानाची क्षमता मर्यादित असल्यामुळे, तरुणांची कमी संख्या ही मोठी अडचण ठरत आहे. रेड क्रॉसच्या माहितीनुसार, 65 वर्षांखालील आणि चांगल्या प्रकृतीत असलेली व्यक्तीच रक्तदानासाठी पात्र ठरते. यामुळे भविष्यातील रक्तसंकट टाळण्यासाठी कृत्रिम रक्त हा पर्याय अत्यावश्यक ठरतो आहे.
नवे आजार, नवे आव्हान
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, जपानमध्ये 'डेडली बॅक्टेरियल इन्फेक्शन' नावाचा एक नवा संसर्ग देखील पसरू लागला आहे, जो केवळ 48 तासांत मृत्यूला कारणीभूत ठरतो आहे. कोविडनंतर हे जपानसमोरचे नवीन आव्हान आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, जपानने आरोग्यविज्ञानाच्या इतिहासात एक नवीन पायरी गाठली आहे. कृत्रिम रक्त निर्मिती ही भविष्यातील आरोग्यविषयक समस्यांवरील प्रभावी उपाय ठरू शकतो, असे मानले जात आहे.