| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. १२ जून २०२५
सांगली – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने रणशिंग फुंकले असून, कार्यकर्त्यांनी युद्धपातळीवर तयारीला लागावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले आहे. सांगलीत पार पडलेल्या भाजप सुकाणू समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या आगामी कार्यपद्धतीवर सखोल चर्चा झाली. यावेळी प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
विखे-पाटील यांनी सांगितले की, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची की स्वतंत्र, याचा निर्णय लवकरच वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जाईल. मात्र, निवडणूक कुणाच्याही माध्यमातून लढवली गेली, तरी उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक प्रभागात पक्ष संघटना अधिक बळकट करावी, बूथस्तरावर सक्रीय कार्यकर्त्यांची यादी तयार ठेवून जनतेशी थेट संपर्क वाढवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. शासनाच्या विविध योजना आणि कार्यांचा प्रचार करून सामान्य नागरिकांपर्यंत त्या पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.
या बैठकीच्या निमित्ताने नुकतेच निवडून आलेले ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षांचा सत्कारही मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.