yuva MAharashtra निनिष्ठावान पाटील गट विशाल पाटलांच्या नेतृत्वात कार्यरत राहण्याची चिन्हे

निनिष्ठावान पाटील गट विशाल पाटलांच्या नेतृत्वात कार्यरत राहण्याची चिन्हे


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. २४ जून २०२५

गेल्या दशकभराच्या राजकीय प्रवासात सावलीसारखा साथ देणारा मदन पाटील गट, जयश्री पाटील यांच्या अनपेक्षित भाजपप्रवेशामुळे काहीसा गोंधळलेला होता. मात्र आता तो सावरल्याचं चित्र आहे. या गटाने काँग्रेसमध्येच कार्यरत राहण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणे नव्याने मांडली जात आहेत. वसंतदादा घराण्याचे वारसदार खासदार विशाल पाटील काँग्रेसमधील निर्माण झालेली नेतृत्वशून्यता भरून काढण्यासाठी पुढे सरसावल्याचे स्पष्ट होत आहे.

मदन पाटील गटातील अल्पसंख्याक नेते व कार्यकर्ते भाजपप्रवेशास ठाम विरोध दर्शवित असून, काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगितले आहे. प्रा. सिकंदर जमादार, युनुस महात, फिरोज पठाण, तौफिक शिकलगार यांसारख्या निष्ठावंतांनी आपली भूमिका स्पष्ट करत काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या गटाचे नेतृत्व आता खासदार विशाल पाटील यांच्या दिशेने झुकल्याचे दिसत आहे.

जयश्री पाटील यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसविरोधात बंडखोरी करून उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी त्यांना विशाल पाटलांची छुपी साथ मिळाली होती. महाविकास आघाडीच्या निर्णयांना बगल देत त्यांनी ‘घरच्यांचे’ नातं जपत पाटलांची बाजू घेतली. त्यावेळचे मैत्र जपताना पाटील यांनीही व्यासपीठावरून पाठींबा दिला होता.

सांगलीच्या राजकारणात वसंतदादा घराण्यातील अंतर्गत कुरबुरी नव्या नाहीत. पूर्वीही विधानसभा, साखर कारखाना किंवा बँकेच्या निवडणुकांमध्ये घराण्याचे दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. एकेकाळी प्रकाश बापू पाटील आणि मदन पाटील यांच्यातील लढतीतून मतांचे विभाजन होऊन तिसऱ्या उमेदवाराला यश मिळाले होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही विशाल पाटील यांनी मदन पाटील यांना हरवत विजय मिळवला होता. त्यामुळे राजकीय सख्य हे या घराण्यात कायमस्वरूपी नसून, सोयीच्या वेळी बदलत असते हे जनतेला परिचित झाले आहे.

विशाल पाटलांनी भाजपविरोधात लोकसभा लढवून विजयी होत घराण्याचा सन्मान राखला. मात्र, त्यासाठी बंडखोरी करावी लागली. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व वसंतदादा आघाडी एकत्र येत २० हजार मतांची आघाडी मिळवण्यात यशस्वी ठरली. मात्र विधानसभा निवडणुकीत हे समीकरण टिकवता आले नाही. व्यासपीठावरून दिलेले आश्वासन मतांमध्ये बदल करत नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून मतदारांचा विश्वास मिळतो, हे सत्य अधोरेखित झाले.

जयश्री पाटील यांचा भाजपप्रवेश ही मनापासून घेतलेली भूमिका होती का? की वसंतदादा बँकेतील व्यवहारांवरून सुरू असलेल्या चौकशीपासून सुटका मिळवण्याचा मार्ग? असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. या प्रवेशामागे भाजपचे शेखर इनामदार आणि जनसुराज्यचे समित कदम यांचे प्रयत्न असल्याचे मानले जात असले तरी, हा निर्णय साशंकतेत ढवळून निघालेला वाटतो.


या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची भूमिकाही लक्षवेधी ठरणार आहे. सध्या त्यांचे खासदार गटाशी फारसे सख्य नसल्याचे बोलले जात असून, पक्षाविषयी त्यांचे समाधानही मर्यादित आहे. मात्र पर्याय अभावामुळे त्यांची राजकीय दिशा काय असेल याकडेही लक्ष लागले आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नव्या जोमाने मांडणी सुरू झाली असून, विशाल पाटील हे ‘वसंतदादा आघाडी’ या स्वरूपात की काँग्रेसचे खुले नेतृत्व म्हणून पुढे येतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे. अल्पसंख्याक नेतृत्वाची उणीव भरून काढणे, भाजपच्या आघाडीचा मुकाबला करणे आणि काँग्रेसमध्ये नवसंजीवनी निर्माण करणे हे त्यांच्यापुढील प्रमुख आव्हान असेल.