| सांगली समाचार वृत्त |
पुणे - मंगळवार दि. २४ जून २०२५
पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे रेल्वे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज जंक्शनला आजही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. प्रवाशांना योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी खासदार विशाल पाटील यांनी पुण्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत केली.
पुणे आणि सोलापूर रेल्वे विभागातील खासदारांसोबत झालेल्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत हे मुद्दे चर्चिले गेले. या बैठकीचे उद्दिष्ट विभागातील रेल्वे विषयक समस्या समजून घेणे व त्यावर उपाययोजना आखणे असे होते. खासदार सुप्रिया सुळे, ओमराजे निंबाळकर, धैर्यशील मोहिते, डॉ. शिवाजी काळगे, रजनी पाटील, नितीन पाटील, मेधा कुलकर्णी, भाऊसाहेब वाघचौरे, निलेश लंके, डॉ. अमोल कोल्हे आणि श्रीरंग बारणे यांचीही या बैठकीस उपस्थिती होती.
विशाल पाटील यांनी मिरज रेल्वे जंक्शनवरील असुविधांची सविस्तर माहिती दिली. फलाट क्रमांक १ वगळता अन्य फलाटांवर निवाऱ्यांची अत्यंत कमतरता असून, पावसाळ्यात प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक फलाटांवर लिफ्टची व्यवस्था नाही; सरकते जिने नाहीत. त्यामुळे वयोवृद्ध, दिव्यांग व महिलांना सामानासह प्रवास करणे कठीण जाते.
पैसेंजर गाड्या मुख्यतः फलाट २, ४ व ५ वर थांबत असल्याने अशा प्रवाशांना भरपूर हाल सहन करावे लागतात. पार्किंगची सुविधा आजही निकृष्ट दर्जाची असून, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायम आहे. फर्स्ट क्लास वेटिंग रूमचाही अभाव असून स्वच्छता व्यवस्थेचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे.
पाटील यांनी पिटलाईनचे रखडलेले काम, जंक्शनमध्ये प्रस्तावित मॉलचे अनिश्चित भवितव्य, वाईल्ड हेल्पलाईनसाठी अपुरी जागा, विशेष गाड्यांच्या बाबतीत रेल्वे प्रशासनाची उदासीनता यावरही संताप व्यक्त केला. “हे प्रश्न आजचे नाहीत, पण त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. या अवस्थेत कधी सुधारणा होणार?” असा थेट सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला.