| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - सोमवार दि. ३० जून २०२५
भारतीय समाजात सोन्याला केवळ दागिन्याचं नव्हे, तर आर्थिक स्थैर्याचं प्रतीक मानलं जातं. मात्र, घराघरात जपलं जाणारं हे मोलाचं धातू देशाच्या आर्थिक धोरणांतही तितकंच मोलाचं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नुकत्याच एका माहितीपटाद्वारे आपला 'गोल्ड वॉल्ट' प्रथमच जनतेसमोर सादर केला असून, त्यातून देशाच्या आर्थिक बळकटीचा झलक मिळतो.
८७० टन सोनं – केवळ धातू नव्हे, तर शक्तीचं प्रतिक
आरबीआयच्या तिजोरीत सध्या तब्बल ८७० टन सोने साठवण्यात आलं आहे. १२.५ किलो वजनाच्या सोन्याच्या विटा स्वरूपात हे सोने देशभर विविध सुरक्षित स्थानांवर ठेवण्यात आले आहे. हे केवळ मौल्यवान धातू म्हणून नाही, तर देशाच्या आर्थिक स्थैर्याचा कणा म्हणून पाहिलं जातं. १९९१ च्या आर्थिक अरिष्टानंतर या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
‘अनलॉक्ड: बियॉन्ड द रुपी’ – एका माहितीपटातून उलगडली आर्थिक यंत्रणा
जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या ‘अनलॉक्ड: बियॉन्ड द रुपी’ या मालिकेद्वारे आरबीआयने आपल्या कार्यपद्धतीचा उलगडा केला आहे. यामध्ये चलननिर्मिती, नोटा छपाई प्रक्रिया आणि सोन्याचा साठा या सर्व गोष्टींचे स्पष्ट दर्शन घडवले आहे. ही एक ऐतिहासिक पावलं मानली जात आहे.
जगात सर्वाधिक चलन छापणारा देश – भारत
हा माहितीपट एक धक्कादायक वास्तव समोर आणतो – भारतात दरवर्षी तब्बल १३,००० कोटी युनिट नोटांची छपाई केली जाते. तुलनात्मकदृष्ट्या, अमेरिका आणि युरोपमध्ये ही संख्या फारच कमी आहे. सध्या देशात चलनात असलेल्या नोटांचे एकूण मूल्य ३८.१ कोटी रुपये इतकं आहे.
‘मेड इन इंडिया’ नोटा – बनावट चलनाला आळा
पूर्वी नोटा छपाईसाठी वापरला जाणारा कागद परदेशातून आयात केला जात असे, ज्यामुळे बनावट नोटांचा धोका वाढत असे. मात्र आता, नोटा छपण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू – कागद, शाई, मशिनरी – पूर्णपणे देशातच तयार होतात. यामुळे चलनाच्या सुरक्षिततेत मोठी वाढ झाली आहे.
आरबीआयचा हा नवा माहितीपट केवळ बँकेची कार्यपद्धती नव्हे, तर देशाच्या आर्थिक स्वावलंबनाची आणि सुरक्षिततेची कहाणी सांगतो. सोन्याचा साठा, चलननिर्मितीची आत्मनिर्भरता आणि पारदर्शकतेकडे उचललेलं हे पाऊल भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्याचा विश्वास अधिक दृढ करतं.