yuva MAharashtra एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, ई-ट्रॅक्टरमुळे शेतीमध्ये हरित क्रांतीची नांदी

एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, ई-ट्रॅक्टरमुळे शेतीमध्ये हरित क्रांतीची नांदी

              फोटो सौजन्य : Flickr. Com

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - सोमवार दि. ३० जून २०२५

इंधनाच्या वाढत्या किमतींना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक टप्पा! ठाण्यात देशातील पहिल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची अधिकृत नोंदणी करण्यात आली असून, ही घटना कृषी क्षेत्रात नवदिशा निर्माण करणारी ठरत आहे. केवळ ३०० रुपयांमध्ये एक एकर नांगरणीसाठी सक्षम असलेला हा ट्रॅक्टर पर्यावरणपूरक तसाच आर्थिकदृष्ट्याही लाभदायक आहे.

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्या या ऐतिहासिक नोंदणीप्रसंगी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, ॲटोनेक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे आणि सेल्स मॅनेजर अभिषेक शिंदे हे उपस्थित होते.

परिवहनमंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, २०३० पर्यंत रस्त्यावरील वाहनांपैकी ३०% वाहने ही विजेवर चालणारी असावीत, हे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. याच दृष्टीने इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल माफी, अनुदान योजना आणि बिनव्याजी कर्जसुविधा राबवली जात आहे, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे.

ई-ट्रॅक्टरचा देखभाल खर्च अत्यल्प असून, वापरासाठी लागणारी वीज डिझेलच्या तुलनेत ७०% पर्यंत स्वस्त ठरते. त्यामुळे पारंपरिक डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत ही यंत्रणा अधिक टिकाऊ आणि किफायतशीर ठरत आहे.
शेतीसाठी खास डिझाइन करण्यात आलेला हा ट्रॅक्टर दररोजच्या कामात मोठी बचत घडवतो. जिथे पारंपरिक ट्रॅक्टरसाठी एका एकराची नांगरणी १२०० ते १५०० रुपये खर्चिक ठरते, तिथे ई-ट्रॅक्टर हा खर्च केवळ ३०० रुपयांपर्यंत मर्यादित ठेवतो.

महाराष्ट्र शासनाच्या २०२५ पर्यंतच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाअंतर्गत ऑटोनेक्स्ट कंपनीच्या ई-ट्रॅक्टरवर १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळण्याची सुविधा शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात आली आहे.

शेतीत आधुनिकतेची पावले टाकत असताना हा ई-ट्रॅक्टर भविष्यातील शेतकऱ्यांसाठी "किफायतशीर साथीदार" ठरणार आहे, हे निश्चित!