| सांगली समाचार वृत्त |
धौलपूर - सोमवार दि. ३० जून २०२५
राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातील बहज गावामध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) हजारो वर्षांपूर्वीच्या एका अत्यंत समृद्ध आणि प्राचीन हिंदू संस्कृतीचे धागे उलगडले आहेत. इ.स.पू. ३५०० ते १००० या दरम्यान अस्तित्वात असलेल्या या संस्कृतीच्या पुराव्यांनी संशोधकांना थक्क करून टाकले आहे.
या परिसरात जमिनीच्या २३ मीटर खोल एक प्राचीन नदीप्रणाली (पॅलिओचॅनेल) सापडल्याने संशोधनाला नवे परिमाण मिळाले आहे. या जलप्रणालीचा संबंध ऋग्वेदात वर्णन केलेल्या सरस्वती नदीशी असावा, असा तर्क संशोधकांनी लावला आहे. हीच नदीकाठची संस्कृती कदाचित हजारो वर्षांपूर्वीच्या भारतीय नागर संस्कृतीचा गाभा ठरली असावी.
मथुरेपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी पाच महिन्यांच्या उत्खनन मोहिमेत देवी-देवतांच्या मूर्ती, हाडांपासून तयार वस्तू, शंखाच्या बांगड्या, रत्नमालिका, तसेच तांब्याची व चांदीची नाणी असे अनेक ऐतिहासिक अवशेष सापडले आहेत. विशेष म्हणजे, सुमारे ४ मीटर खोलीवर एका प्राचीन स्त्रीचा सांगाडा सापडल्याने या वस्तीचे सामाजिक जीवन उलगडण्यास मदत होत आहे.
इतकेच नव्हे तर, यज्ञकुंडांची पंधरा उदाहरणे, शिव-पार्वतीच्या मूर्ती, ब्राह्मी लिपीतील मुद्रांक, तसेच महाजनपदकालीन वैशिष्ट्यपूर्ण अवशेष ही संस्कृती अत्यंत प्राचीन असल्याचे दर्शवतात. विशेष म्हणजे मृत्तिकापात्रांचा व मातीच्या भांड्यांतील नाण्यांचा प्रचंड साठा येथे मिळाला आहे.
स्थानिक दंतकथांनुसार या भागाचा संबंध भगवान कृष्णाचा नातू वज्रनाथ याच्याशी आहे. 'वज्रनगरी'चा अपभ्रंश ‘बहज’ झाल्याचे काही तज्ज्ञ मानतात. याच अनुषंगाने ‘वजनगर’ व ‘कंकाली टीला’ अशा उल्लेखांची नोंद जैन शिलालेखांमध्येही आढळते. या परिसराचा एक भाग ब्रजभूमीच्या ८४ कोस परिक्रमा मार्गात मोडतो, त्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून याचे महत्व अधिक वाढते.
दुर्दैवाने, ही ऐतिहासिक जागा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली असून जागरूकतेच्या अभावामुळे महत्त्वाचा पुरातत्त्वीय वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, ASI च्या संशोधनामुळे या भागाचा उजळलेला इतिहास पुन्हा एकदा जनतेसमोर येऊ लागला आहे.