| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. १५ जून २०२५
सांगलीतील माधवनगरजवळील कर्नाळ रोडवर असलेल्या 'सुशांत गार्डन' या मंगल कार्यालयात लग्न समारंभाच्या गडबडीत एका महिलेकडील सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास करणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. फकरुद्दीन शेख (वय २२, रा. बदाम चौक, सांगली) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याकडून सुमारे ५ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
घटना ४ जून रोजी घडली असून सोलापूर जिल्ह्यातील अंजली कोल्ले या महिलेकडील दागिने मंगल कार्यालयातील लग्न सोहळ्यातून चोरीस गेले होते. या प्रकरणी कोल्ले यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आले. गुन्ह्याचा तपास करत असताना पथकातील विक्रम खोत, अनिल कोळेकर आणि दऱ्याप्पा बंडगर यांना खबऱ्यांकडून फकरुद्दीन शेखवर संशयाची माहिती मिळाली.
त्यावरून पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून सोन्याचे वेढण, लॉकेट, गोफ, गंठण, चांदीच्या बिंदल्या आणि इतर मौल्यवान दागिने हस्तगत करण्यात आले.
ही कारवाई संजयनगर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एकत्रित प्रयत्नातून पार पडली. पथकात सहायक निरीक्षक अमर नरळे, सतिश माने, नागेश खरात, सागर लवटे, संदिप गुरव, महादेव नागणे, सागर टिंगरे, मच्छिंद्र बर्डे, उदयसिंह माळी, संदिप नलावडे, केरूबा चव्हाण आणि सायबर पोलिस ठाण्याचे अभिजित पाटील यांचा सहभाग होता.