| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. २७ जून २०२५
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात गुरुवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. चारधाम यात्रेसाठी निघालेली एक खासगी प्रवासी बस अचानक अलकनंदा नदीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत ३ यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर १० जण बेपत्ता आहेत.
ही दुर्घटना बद्रीनाथ महामार्गावर घडली. केदारनाथहून बद्रीनाथकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला एका ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट नदीच्या खोल दरीत कोसळली.
या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये एकूण २० भाविक प्रवास करत होते. प्रवाशांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील भाविकांचा समावेश होता. यातील चालक हरिद्वारचा असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील दोन भाविक या बसमध्ये होते.
जखमी प्रवाशांची नावं खालीलप्रमाणे आहेत:
1. दीपिका सोनी (४२) – राजस्थान
2. हेमलता सोनी (४५) – राजस्थान
3. ईश्वर सोनी (४६) – गुजरात
4. अमिता सोनी (४९) – मीरा रोड, महाराष्ट्र
5. भावना ईश्वर सोनी (४३) – गुजरात
6. भव्य सोनी (७) – गुजरात
7. पार्थ सोनी (१०) – मध्य प्रदेश
8. सुमित कुमार (२३) – हरिद्वार (चालक)
सर्व जखमींना रुद्रप्रयागच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय सेवा सुरू आहे.
शोधमोहीम सुरूच
या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय केली आहे. विशेष जलतरण पथक, सोनार उपकरणं आणि स्थानिक आपत्ती निवारण दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. अलकनंदा नदीच्या प्रचंड प्रवाहात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वेगवान पाण्याचा प्रवाह आणि हवामानातील बदलामुळे शोधमोहीमेला अडचणी येत आहेत.
प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा पूर्ण ताकदीने बचाव कार्यात गुंतल्या असून भाविकांच्या कुटुंबीयांशी सतत संपर्क साधला जात आहे.