| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. २७ जून २०२५
छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या समतेच्या व मानवतेच्या विचारांचा वारसा महाराष्ट्रात रुजवण्याचे भव्य कार्य लोकराजा शाहू महाराजांनी समर्थपणे पार पाडले. या कार्याचा एक प्रेरणादायी भाग म्हणजे गुलाबराव पाटील घराण्यातील सदाशिवराव पाटील बेनाडीकर यांना “क्षात्रजगद्गुरू” पदाने सन्मानित करून, मराठी मातीतील क्षात्रतेज आणि पुरोगामी मूल्यांचा गौरव त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिला. त्यांच्या शिक्षण, शेती, महिला सक्षमीकरण, कुस्ती, जलव्यवस्थापन, आरक्षण आणि वंचितांच्या विकासासाठी केलेल्या कार्याने समाजात नवे आदर्श निर्माण केले.
शाहू महाराजांच्या दृष्टीकोनातून साकारलेले राधानगरी धरण हे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारे ठरले. मात्र, आज विकासाच्या नावाखाली शेतकरी वर्ग अडचणीत सापडलेला दिसतो, म्हणूनच आजच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा शाहू महाराजांसारख्या नेतृत्वाची गरज आहे, असे मत प्रा. एन.डी. बिरनाळे (राज्य कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक विभाग) यांनी व्यक्त केले.
सांगली शहर जिल्हा काँग्रेस आणि सेवा दलाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात काँग्रेस भवन, सांगली येथे ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित ढोले (सेवा दल अध्यक्ष) होते. त्यांनी शाहू महाराजांच्या शैक्षणिक क्रांतीची माहिती देताना, त्यांच्या वसतिगृह उपक्रमातून गरीब विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळाल्याचे नमूद केले. विशेषतः महिलांसाठी आरक्षण, विधवांसाठी पुनर्वसन अशा सामाजिक योजना त्यांनी प्रभावीपणे राबवल्या, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक करताना मौलाली वंटमुरे यांनी शाहू महाराजांचे सर्वधर्मसमभाव आणि समतेचे कार्य अधोरेखित केले. ते म्हणाले, शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने जनतेसाठी वात्सल्याने वागणारे लोकराजा होते, ज्यांनी सर्व थरातील लोकांचे शोषण थांबवण्यासाठी झटले.
कार्यक्रमात अनिल मोहिते यांनी शाहू महाराजांच्या विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा घेत, भारतीय संविधानातील मूल्यांची मूळ प्रेरणा म्हणजेच शाहू महाराज असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात पैगंबर शेख, विठ्ठलराव काळे, सुनील भिसे, अरुण गवंडी, शमशाद नायकवडी, मिना शिंदे, गणेश वाघमारे, योगेश पाटील, विश्वास यादव, सुरेश गायकवाड, प्रकाश माने, रमजान संदी यांच्यासह काँग्रेस व सेवा दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.